Breaking News

राज्यातील 121 केंद्रांवर हमीभावाने कापूस खरेदीला सुरुवात - सुभाष देशमुख

मुंबई, दि. 26, ऑक्टोबर - राज्यात कापूस हंगाम 2017-2018 मध्ये कापसाच्या दरात मंदी आल्याने शेतक-यांच्या हिताकरिता राज्यशासनाने पुढाकार घेतला. राज्यात प्रथमच  कापूस हमी भावाने खरेदीसाठी केंद्र शासनाचे नोडल एजंट सीसीआय आणि महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक व पणन महासंघ यांची 121 कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्याची  माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली. कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. शेतकर्‍यांना कापूस विक्रीस आणतांना  प्रत्येकवेळी 7/12 उतारा, आधारकार्ड व इतर कागदपत्रे आणण्याचा त्रास होवू नये. तसेच शेतक-यांच्या चुका-यांची रक्कम(पेमेंट) थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याक रिता राज्यशासनाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती स्तरावर शेतक-यांची दि.18 ऑक्टोबर पासून नोंदणीसाठी सुरूवात केली आहे.
राज्यात कापूस पणन महासंघाव्दारे 60 केंद्र व केंद्र शासनाचे नोडल एजंट सीसीआयव्दारे 61 अशा 121 केंद्रांवर हमी दरावर कापूस खरेदी करण्यात येणार आहे. बुधवार दि. 25  पासून महासंघाव्दारे 39 कापूस खरेदी केंद्रावर खरेदीला सुरूवात करण्यात आलेली असून उर्वरित 21 केंद्रांवर दि.26 ऑक्टोबरनंतर सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती  मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात शासनाने कापूस उत्पादक शेतक-यांच्या हितासाठी हमी दरानुसार कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. राज्यातील शेतक-यांनी खरेदी केंद्रांवर नोंदणी करावी आणि  एफएक्यू प्रतीचा कापूस महासंघाकडे हमी दरावर विक्रीसाठी आणावा. तसेच याबाबात काही अडचण असल्यास, त्याची तक्रार कापूस पणन महासंघाच्या विभागीय व्यवस्थापकांकडे क रावी, असे आवाहनही श्री. देशमुख यांनी केले आहे.