Breaking News

किमान 300 रु.वेतनाची कोकण कृषी विद्यापीठ कामगारांची मागणी

रत्नागिरी, दि. 26, ऑक्टोबर - नव्याने स्थापन झालेल्या कोकण कृषी विद्यापीठ श्रमिक कामगार संघटनेने किमान 300 रुपये वेतन मिळावे, यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.  तपस भट्टाचार्य यांना निवेदन देण्यात आले आहे. विद्यापीठात 20 ते 25 वर्षांपासून काम करणार्‍या कामगारांना तुटपुंज्या रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह चालवावा लागत  असल्याच्या मुद्द्याकडे कामगारांनी कुलगुरूंचे लक्ष वेधले आहे.
दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात रोजंदारीवर सुमारे 350 कामगार काम करतात. त्यांना किमान वेतन किंवा इतर भत्ते मिळत नाहीत. हे कामगार भूमिपुत्र  असून त्यांच्यापैकी अनेक कामगारांच्या जमिनी विद्यापीठासाठी गेल्या. प्रकल्पग्रस्त असूनही त्यांच्याकडे लक्षच दिले जात नसून कामगारांचा विचार विद्यापीठाने केला नसल्याचे  निवेदनात नमूद केले आहे. केंद्र शासन निर्णयाप्रमाणे किमान 300 रुपये वेतन कामगारांना मिळावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. त्यानुसार वेतन देण्याचा आदेश येऊनसुद्धा  त्याची दखल घेतलेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.