Breaking News

यंदा 100 टक्के पाऊस!

मुंबई, दि. 01, ऑक्टोबर - विदर्भ वगळला तर राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. संपूर्ण राज्यात गेल्या चार महिन्यांमध्ये सरासरीएवढा म्हणजे 100 टक्के पाऊस पडला. विदर्भामध्ये सरासरीपेक्षा 23 टक्के कमी, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 14 टक्के अधिक पाऊस पडला.
भारतीय हवामान विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडला. मोसमी वार्‍यांनी आता राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. मात्र दक्षिण भारतात अजूनही मोसमी वारं सक्रिय आहे. देशात यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. राज्यात दरवर्षी सरासरी 1007.3 मिलीमीटर पाऊस पडतो. यावेळी 30 सप्टेंबपर्यंत 1006.5 मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोकणात सरासरीच्या 10 टक्के जास्त, मध्य महाराष्ट्रात 17 टक्के जास्त तर मराठवाड्यात 5 टक्के कमी पाऊस झाला. पावसाने विदर्भाकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसून आलं. कारण विदर्भात तब्बल 23 टक्के कमी पाऊस पडला.
विदर्भातील नागपूर वगळता इतर सर्व जिल्ह्यात पावसाने ओढ दिली. अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया येथे 70 टक्केही पाऊस झाला नाही. मराठवाड्यात परभणी, हिंगोली आणि नांदेड येथे 70 ते 80 टक्के पाऊस पडला. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. गेल्या वर्षी राज्यात सरासरीपेक्षा 14 टक्के अधिक पाऊस पडला होता. त्यापूर्वी सलग दोन वर्षे राज्यात दुष्काळ होता.