Breaking News

भाजप-शिवसेनेचे सरकार म्हणजे सावळा गोंधळ - अजित पवार

मुंबई, दि. 24, सप्टेंबर - भाजप-शिवसेनेचे सरकार म्हणजे सावळा गोंधळ असल्याची टीका विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज येथे केली. राष्ट्रवादी  काँग्रेसच्या इतर मागासवर्गीय विभागाच्या (ओबीसी सेल) राज्यस्तरीय मेळाव्या दरम्यान ते बोलत होते.
सध्या जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे केले जात आहे. मागासवर्गीय समाजावर हल्ले केले जात आहे, लोकांचे जीव घेतले जात आहे. पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र  नेमका चाललाय कुठे ? सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती काढून घेतली. सरकारचे मंत्री, अधिकारी स्वतःच्याच मुलांसाठी सरकारी योजना लाटत आहेत.  मग आर्थिक दुर्बल असलेली जनता कुणाकडे जाणार, असा सवाल करत पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.
अंगणवाडी सेविकांनी सरकार विरोधात प्रचंड मोर्चा काढला पण त्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. राज्यात कोळसा नाही म्हणून लोकांना भारनियमनाचा  त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने थाटामाटात कर्जमाफीची घोषणा केली. आतापर्यंत एकाही शेतकर्‍याला पैसे मिळाले नाहीत. नाशिक जिल्हा रुग्णालयात  सोयीसुविधा नसल्याने लहान मुलांचे जीव गेले. हे सरकार काय झोपा काढत आहे का? पुरोगामी विचारांचा, प्रगत महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे? अशा शब्दात  पवार यांनी सरकारवर हल्ला चढवला. बुलेट ट्रेनचा फायदा मुंबईला होणार नसून गुजरातलाच होणार आहे. कोणतीही निवडणूक आली की पंतप्रधान थेट उद्घाटनाचा  कार्यक्रम हाती घेतात. सरकारने वापरात असलेल्या रेल्वे मार्गात सुधारणा करावी मगच बुलेट ट्रेन आणावी. हे सरकार सर्व गोष्टीत अपयशी ठरले आहे. या सरकारचे  पितळ उघडे करण्याचे काम आपल्याला करायला हवे, असा संदेश पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.