Breaking News

कोरेगाव तालुक्यात शेतकरी गट स्थापन करा- श्‍वेता सिंघल

सातारा, दि. 01, सप्टेंबर - राज्य शासनाने आता शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून अनेक कंपन्यांबरोबर करार केला असून ज्या भागात जे उत्पादन  येते, तेथील शेतकर्‍यांचे गट तयार करुन ते त्या कंपनीशी जोडून दिले जातील. त्यातून दलालांची साखळी मोडून उत्पादन खर्चावर आधारित भाव शेतकर्‍यांना  मिळणार आहे. त्यामुळे कोरेगाव तालुक्यात आलं उत्पादक शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात शेतकरी गट स्थापन करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी  आज केले. कोरेगाव तालुक्यातील वाठार येथे आयोजित केलेल्या महाराजस्व अभियानात जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी  अधिकारी आनंद भंडारी, कोरेगाव पंचायत समितीचे सदस्य राजाभाऊ जगदाळे , उपविभागीय अधिकारी किर्ती नलावडे , तहसीलदार स्मिता पवार , जिल्हा परिषद  सदस्य भिमराव पाटील, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
महाराजस्व अभियान हे जनतेला विविध प्रकारचे दाखले ,विविध योजनांचे लाभ तुमच्या गावात येऊन देण्याची योजना आहे. तालुक्यातील आणि जिल्ह्यातील संबंधित  विभागाचे अधिकारी दिवसभर आपापले दालन उभे करुन तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करुन तिथल्या तिथे तुमच्या आधार कार्डपासून ते तुमच्या रेशनकार्ड पर्यंतचे  सर्व प्रकारचे दाखले या एक दिवसाच्या कॅम्पमध्ये देण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने केली जाते. आज वाठारपासून आम्ही या महाराजस्व अभियानाची सुरुवात  केली असून, जिल्ह्यात विविध तालुक्यातील गावात असे एक दिवशीय कॅम्प घेऊन जास्तीत जास्त जनतेला त्यांचे विविध प्रकारचे दाखले त्यांच्या गावात मिळावेत,  त्यांचे जिल्हा आणि तालुका कचेरीतील हेलपाटे वाचावेत आणि त्यांना तात्काळ सेवा मिळावी हा या महाराजस्व अभियानामागचा मुळ हेतू असल्याचे जिल्हाधिकारी  श्‍वेता सिंघल यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील अर्ध्या भागातील शेती व्यवसाय हा पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्यामुळे तुमच्या कडून जे उत्पादन घेतले जाईल त्याला कृषी विभागाच्या  वतीने सर्व सेवा पुरविल्या जातील, असेही जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांनी अश्‍वासन दिले.