Breaking News

नाशिक सायकलिस्ट्स गांधी जयंती निमित्त ‘इंडियन सायकल डे’ची सुरुवात

नाशिक, दि. 26, सप्टेंबर -  महाराष्ट्र पर्यटन विकास महामाशिक सायकलिस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोबर गांधी जयंती हा दिवस इंडियन सायकल डे  म्हणून साजरा करतांना नाशिक ते मुंबई सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक सायकलिस्ट्स गेल्या 6 वर्षापासून 2 ऑक्टोबर गांधी जयंती हा दिवस इंडियन सायकल डे म्हणून साजरा करीत आहे. या दिवशी जनतेस पर्यावरण, स्वच्छता  व नागरी कर्तव्य असे संदेश दिला जातो. संपूर्ण देशात 2 ऑक्टोबर इंडियन सायकल डे साजरा व्हावा असा मानस ठेवून ही सायकल चळवळ देशभरात पोहचावी  म्हणून वर्ष 2016 पासून नाशिक ते मुंबई सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.
या वर्षी नाशिक सायक व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत हरित भारत हा संदेश घेऊन नाशिक ते मुंबई सायकल रॅलीचे  आयोजन करण्यात येत असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. नाशिक सायकलिस्ट्स आणि एमटीडीसीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील  सायकलिस्ट्स संघटनांना रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे.
या रॅलीच्या नियोजनाप्रमाणे पहिल्या दिवशी म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता गोल्फ क्लब मैदान येथून रॅलीची सुरुवात होईल. ही रॅली  घोटी-कसारा-शहापूर मार्गे 120 किमीचे अंतर पार करून भिवंडी फाटा येथे मुक्कामी राहणार आहेत. दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजता रॅलीचे प्रस्थान होऊन 65  किमीचे अंतर ठाणे-घाटकोपर-दादर-भायखळा-फोर्ट मार्गे गेटवे ऑफ इंडिया पर्यंत सकाळी 11 वाजता पोचणार असल्याची माहिती नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष  प्रविणकुमार खाबिया यांनी दिली.
महाराष्ट्रभर सायकल चळवळ मोठ्या प्रमाणात राबविण्याचा मानस यावेळी एमटीडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांनी व्यक्त केला. येत्या 27  सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने नाशिक सायकलीस्ट्ससह सायकल सदस्य नोंदणी मोहीम करण्यात येणार असून पुढीलवर्षी राज्य पातळीवर 1  लाख सायकलीस्ट्स सदस्य जोडण्याचा कार्यक्रम हाती घेण्याची घोषणा राठोड यांनी यावेळी केली. भंडारदरा धरणाला परिक्रमा करणारा 64 किमीचा सायकल मार्ग,  प्रत्येक पर्यटन स्थळी सायकल ट्रॅक टूर डी सह्याद्री आदी उपक्रमांबाबत राठोड यांनी माहिती सांगितली.
गेट वे ऑफ इंडिया येथे सायकलीस्ट्सचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे स्वागत करण्यात येणार आहे. तेथे सर्व सायकलीस्ट्स पर्यावरण, स्वच्छता आणि  नागरी कर्तव्य असे संदेश देणारे फलक घेऊन एमटीडीसीच्या अधिकार्‍यांसोबत जनजागृती करणार आहे. शक्य झाल्यास या कार्यक्रमाला पर्यटन मंत्री जयकुमार रावल  उपस्थित राहणार आहेत.
यावेळी एमटीडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे, नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष  प्रविणकुमार खाबिया, सल्लागार किरण चव्हाण, राजेंद्र वानखेडे, नितीन भोसले, मनीषा रौदळ, रवींद्र दुसाने तसेच सायकलिस्ट्स सदस्य उपस्थित होते.
अशी असेल नाशिक मुंबई सायकल वारी
1 ऑक्टोबर पहिला दिवस : एकूण 120 किमीचा प्रवास, घोटी-कसारा-शहापूर-भिवंडी फाटा (मुक्काम)
2 ऑक्टोबर दुसरा दिवण 65 किमीचा प्रवास ठाणे-घाटकोपर-दादर-भायखळा-फोर्ट-गेट वे ऑफ इंडिया येथे स्वच्छता आणि पर्यावरण विषयक जनजागृती