Breaking News

येवला औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु होण्याचा मार्ग मोकळा

येवला, दि. 26, सप्टेंबर -  येवला औद्योगिक क्षेत्र 14.22 कोटीचे पाणीपुरवठ्याचे काम सुरु होत असल्यामुळे येथील औद्योगिक विकासाला चालना मिळणार  असल्याची माहिती छगन भुजबळांचे स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून येवला औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेच्या रु.14.22 कोटींच्या कामाचा कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आला  आहे. सदर कामामध्ये येवला औद्योगिक क्षेत्र जलशुद्धीकरण केंद्र,विंचूर ते येवला एमआयडीसी पर्यंत 250 मीमी व्यासाची डी.आय.जलवाहिनी,विंचूर औद्योगिक क्षेत्र  येथे 500 घ.मी क्षमतेचा जलकुंभ आणि येवला औद्योगिक क्षेत्र येथे 300 घ.मी क्षमतेचा ई.एस.आर बांधणे या कामांचा सामावेश आहे. दि.31 ऑगस्ट 2018 च्या  आत हे काम पूर्ण करण्याचे बंधन कंत्राटदारावर घालण्यात आले आहे. या कामासाठी छगन भुजबळ यांनी आर्थर रोड कारागृहातून उद्योग मंत्र्याशी सतत पत्रव्यवहार  केला होता. तसेच तारांकीत प्रश्‍नाद्वारेही या विषयाचा पाठपुरावा केला होता.
भुजबळांच्या प्रयत्नांमुळेच चिचोंडी येथे नवीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी यापूर्वी 109.34 हे.आर क्षेत्र संपादित करण्यात आले असून सदर क्षेत्राचे सर्वेक्षण  व सीमांकन सुद्धा पूर्ण झाल्याचे लोखंडे यांनी सांगितले आहे. येथील पायाभुत सुविधांच्या कामाकरिता रु.1831 लक्ष निव्वळ व 2106 (ठोक) इतक्या खर्चाचा  प्रस्ताव एमआयडीसी मुख्यालयात मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. लवकरच पायाभुत सुविधांच्या कामाला सुद्धा प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. पाणीपुरवठ्याची व्यवस्था  आणि पायाभुत सोयीसुविधांची कामे मार्गी लागल्यानंतर येथे उद्योग व्यवसाय सुरु होवून मतदारसंघातील बेरोजगार आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याचे  भुजबळांचे स्वप्न असल्याचे लोखंडे यांनी म्हटले आहे.