Breaking News

बाजार समितीच्या नव्या कायद्यामुळे कामगार वर्गासमोर अडचणी - शरद पवार

नवी मुंबई, दि. 26, सप्टेंबर - राज्य सरकारने बाजार समितीचा नवा कायदा आणल्याने सध्या समिती अस्तितवात नसल्याने कामगार वर्गासमोर अडचणी निर्माण  झाल्या आहेत, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी वाशी येथे केले. या समितीवर स्वतंत्र अध्यक्ष नेमण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 84 व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगार मेळावा वाशी येथील बाजार समिती  आवारात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीस पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आल. या  सन्मानाला उत्तर देताना शरद पवार बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमदार सुनील तटकरे, शशिकांत शिंदे, माजी मंत्री गणेश नाईक,  भाजपचे प्रसाद लाड आदी उपस्थित होते.
यावेळी नरेंद्र पाटील म्हणाले की, आपण जर माथाडी कामगारांचे प्रश्‍न घेवून मुख्यमंत्र्यांकडे जात असतांना शरद पवार यांनी आपल्याला साथ द्यावा. आघाडी  सरकारच्या काळात तीन मुख्यमंत्री असून देखील माथाडी कामगारांचे प्रश्‍न सुटले नाही मात्र विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत मात्र वडाळा येथील  घरांच्या प्रश्‍ना सुटण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.
या वेळी शरद पवार म्हणाले की, कामगार क्षेत्रात कंत्राटदारी पद्धत वाढत असल्याकडे कामगार संकटात सापडला आहे. कामगार क्षेत्रातील धोरणे बदलायला  लागल्याने आता कामगारांचा आधार संपुष्टात येत आहे.यामुळे कामगारांची काळजी वाटत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. आपण लवकरच राज्यातील माथाडी  कामगारवर्गाच्या समस्या समजून घेण्यासाठी दौरा करणार असून याची सुरुवात नाशिक येथून करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. या सर्व गोष्टी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष बोलायच्या होत्या. मात्र त्यांना काही कारणास्तव माथाडी कामगार मेळाव्याला उपस्थित राहता आले नसल्याने नंतर मुख्यमंत्र्यांना भेटून  या समस्यांचा उहापोह करणार असल्याची घोषणा पवार यांनी केली. चार पाच पदे स्वत:कडे ठेवली असल्याने वारंवार कोणत्याही कामासाठी हेलपाटे घालावे लागत  असल्याचा टोमणा त्यांनी मुख्यमंत्र्यांचा नामोउल्लेख टाळत मारला. जगामध्ये इंधनाचे दर कमी होत असताना आपल्या देशात मात्र इंधनाचे दर वाढत असल्याने  महागाई वाढायला लागली असल्याने याबद्दल जागरूकता वाढवावी लागेल यासाठी कामगारानी पुढाकार घेण्याचे आवाहन पवार यांनी केले. माथाडी कामगारांना या  महागाईविरोधात लढण्याचे आवाहन पवार यांनी केले.