Breaking News

पाणी नियोजनअभावी शेतकर्‍यांना ऊस भावात फटका

।  मुळा कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात । 47 व्या गळीत हंगामाचाही गडाख यांच्या हस्ते बॉयलर प्रदिपन

अहमदनगर, दि. 22, सप्टेंबर - निळवंडे, भंडारदरा या धरणातील पाण्याच्या व्यवस्थित नियोजनामुळे संगमनेर, प्रवरा अगस्ती या कारखान्यांना मुळा कारखान्यापेक्षा  पावणे दोन टक्के सखर उतारा जादा मिळाला. मुळा धरणातही पाण्याचे अजिबात नियोजन नसल्यामुळे आपल्याला साखर उतारा कमी मिळाला. परिणामी या  भागातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. मात्र हे नुकसान कोणामुळे, याचा अंतर्मुख होऊन विचार करा, असे आवाहन माजी आ. शंकरराव गडाख यांनी केले. मुळा  कारखान्याच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेव तुवर होते. 
ते म्हणाले, बाजारातील परिस्थिती पाहून कोणत्या महिन्यात किती साखर ठेवायची, याचे नियोजन कारखाने करीत असतात. नफा-नुकसानीचा विचार करतात. मात्र  सरकारने ग्राहकांना खुश करण्यासाठी मर्यादा आणून सक्तीने साखर विक्री करण्याचे बंधन घातले. सरकारने मागील वर्षी 24 टक्के तर यावर्षी 8 टक्के साखर साठ्याची  मर्यादा घेतली. त्यामुळे कारखान्यांवर सक्तीने साखर विकण्याची वेळ आली. याचा भुर्दंड ऊस उत्पादक शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे. ऊसाची उपलब्धता वाढावी,  यासाठी मागील वर्षी शंभर टक्के अनुदानावर खते देण्यात आली. त्यासाठी प्रतिटन 195 रुपये खर्च आला. 70:30 च्या सूत्रानुसार शासनाने मुळा कारखान्याच्या 2  हजार 401 निश्‍चित केला. इतर कारखाण्यांपेक्षा रिकव्हरी कमी असतांनाही हा दर निघत असून खत अनुदानासाठी खर्च केला नसता तर ऊसाचा दर आणखी 195  रुपयांनी वाढला असता. कारखान्यांनी तयार केलेली वीज घेण्यास सरकारची तयारी नाही. शेतकर्‍यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून वीज निर्मिती केली. मात्र  सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे या वीजेच्या विक्रीसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. भविष्यात ऊसाला चांगला भाव मिळावा, यासाठी साखरेचा उतारा  वाढविला पाहिजे. यासाठी शेतकर्‍यांनी चांगल्या प्रतीची चांगल्या प्रतीची लागवड करावी.
यावेळी संचालक कचरु गायकवाड, अलका गायकवाड, तसेच उषा दरंदले, बबनराव दरंदले यांच्या हस्ते बॉयलरची विधीवत पुजा करण्यात आली.
वार्षिक सभेत शरद जाधव, जयवंत लिपाने, जालिंदर येळवंडे, संदीप डिके, अशोक कोळेकर, कपूरचंद कर्डिले, बाबा कवडे, संतोष काळे, रामदास कोरडे,  शिवाजीराव शेटे, राजेंद्र टेमक, रामजी  पवार, कारभारी जावळे, कडूबाळ कर्डिले आदिनी यावेळी चर्चेत भाग घेतला. कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटेंनी  आभार मानले.