Breaking News

अनियमित बस फेर्‍यांना कंटाळून विद्यार्थ्यांनी केले बस रोको आंदोलन

शेलगाव देशमुख येथे संतप्त विद्यार्थ्यांनी चार तास एसटी बस सेवा पाडली बंद 

बुलडाणा, दि. 28, सप्टेंबर - अनेक वेळा निवेदन देवूनही विद्यार्थ्यांना न्याय मिळत नसल्याने काल सकाळी 6 वाजेपासून 10.30 पर्यंत विद्यार्थी व पालक शेलगाव  देशमुख बस स्थानकावर डोणगाव व विश्‍वीकडून येणार्‍या बस थाबवून धरुन बसरोको आंदोलन केले. 
शेलगाव देशमुख, कनका बु. व विश्‍वी येथून दररोज जवळपास 150 ते 200 विद्यार्थी शाळा, महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी बसने प्रवास करतात. तसेच  शेलगाव देशमुख, कनका बु. व विश्‍वी येथील नागरिकांना बँक, दवाखाना व इतर कारणासाठी दररोज बसने प्रवास करावा लागतो. शेलगाव देशमुख येथील विद्यार्थी व  पालकांनी अनेकवेळा मेहकर आगार प्रमुखास रात्री मुक्कामी व दुपारी 12.30 वा. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बससेवा सुरु करण्याची मागणी केली. परंतु आगार प्रमुख  या मागणीकडे दूर्लक्ष करत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. आणि येणार्‍या बसचे चालक, वाहक त्यांना वाटेल तेव्हा बस शेलगावला आणतात आणि  वाटेल तेव्हा बस फेरी बंद करतात. या आगार प्रमुखाच्या गलथान कारभाराला कंटाळून शेलगाव देशमुख येथील विद्यार्थी व पालकांनी आज सकाळी 6 वाजेपासून  दुपारी 10.30 वा.पर्यंत 4 तास बससेवा बंद पाडली. वाहक, चालक व गावातील नागरिक यांनी समज घातली परंतु विद्यार्थी बस सोडत नव्हते. त्यानंतर डोणगाव  पोलिस स्टेशनला कळविण्यात आले. पोलिस अधिकारी यांनीसुद्धा समज घालून बससेवा नियमित सुरु करु असे सांगितले, परंतु यांनी आम्हाला जोपर्यंत मेहकर  आगार प्रमुख लेखी देत नाहीत, तोपर्यंत बस सोडणार नाही. असा आग्रह विद्यार्थ्यांनी धरला. शेवटी पोलिस प्रशासनाने आगार प्रमुखास फोन करुन घटनास्थळावर  बोलावले. मेहकर आगार प्रमुख जुमडेसाहेब व डोणगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार आकाश सिंदे हे घटनास्थळावर येवून विद्यार्थी व पालकांचे म्हणणे प्रत्यक्ष लेखी  घेवून त्यांना यानंतर दररोज नियमित बससेवा वेळेवर सोडण्यात येईल असे आश्‍वासन दिले. हा वाद मिटविण्यासाठी ग्रामपंचायतचे सदस्य, पालक व गावातील  नागरिकांनी प्रयत्न केले.