Breaking News

पेट्रोल,डिझेल व गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा सायकल मोर्चा

बुलडाणा, दि. 28, सप्टेंबर - अच्छे दिनांचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या  किंमतीत सतत होत असलेल्या दरवाढीचा बोजा सर्व सामान्य जनतेवर पडत आहे. या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने सर्व सामान्यांचे आर्थिक बजेट  कोलमडले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या अन्यायकारक दरवाढीचा निषेध करून पेट्रोल व डिझेलवर लागणारा राज्य शासनाचा अधिभार रद्द करावा. तसेच  केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतीवर आधारीत दर नियंत्रित करुन सर्वसामान्यांना दिलासा देण्यात यावा, या मागणीसाठी  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज 26 सप्टेबर रोजी शहरात सायकल मोर्चा काढण्यात आला. 
शहरातील गांधी भवन येथून या सायकल मोर्चाला सुरूवात करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी, तालुका अध्यक्ष  डी.एस. लहाने, अँड. सुमित सरदार यांनी केले होते. या आंदोलनात शहरातील असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते सायकल घेवून सहभागी झाले होते. तर पंतप्रधान  नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकृती या मोर्चाचे आकर्षण ठरले होते. या मोर्चाची सुरुवात जयस्तंभ चौक येथून, आठवडी बाजार, सराफा लाईन,  कारंजा चौक, भोंडे चौक, स्टेट बँकचौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांनी पेट्रोल डिझेंलच्या किंमती कमी करा, अशा  घोषणा देवून शहर दणाणुन सोडले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचे जाहिरसभेत रुपांतर झाले. याठिकाणी डी.एस. लहाने, अ‍ॅड. नाझेर काझी,  प्रकाश अवचार यांनी मोर्चेकर्यांना संबोधीत केले. यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकार्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये सन 2013 साली  आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलची किंमत 110 प्रती बॅलर असतांना देशामध्ये पेट्रोलचे दर 75 रुपये व डिझेल 55 रुपये लिटर होते. तेव्हा भाजपा पेट्रोल डिझेलचे  भाव वाढले म्हणून आंदोलन करायचे. आता आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलची किंमत 50 रुपये प्रती बॅलर एवढी कमी म्हणजे निम्यापेक्षा कमी झालेली असतांना  पेट्रोल व डीझेलच्या किंमती अध्यापेक्षा कमी होणे अपेक्षीत होत्या. परंतु केंद्र व राज्य शासनाने यावर वेगवेगळयाप्रकारे जवळपास 55 टक्के पेक्षा जास्त टॅक्स लावुन  त्यांच्या किंमतीत प्रचंड वाढ केली. आज पेट्रोलचे भाव 81 रुपये प्रती लिटर असुन त्यावर 49 रुपये प्रति लिटर टॅक्स ग्राहकांकडून वसुल केल्या जातो या प्रमाणेच  डिझेलचे देखील 61 रुपये प्रति लिटर प्रमाणे ग्राहकांकडून घेतले जातात. एलपीजी गॅस सिलेंडर ही सर्वसामान्यांची जिवनावश्यक बाब असुन सन 2012 साली 392  प्रती सिलेंडर वरुन 784 रुपये प्रती सिलेंडर वर दर आणुन ठेवले आहेत. या प्रकारामुळे सर्व क्षेत्रातील महागाईचा भस्मासुर वाढला आहे. सर्व सामान्यांना जगणे  देखील कठीण झाले आहे. सध्या भाजप सरकारच्या काळामध्ये जनतेची चालवलेली पिळवणुक कधी इंग्रजांनीही केलेली नसावी. या सर्व जुलमाच्या विरोधात राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टीकडून आज सायकल मोर्चा काढुन निषेध करण्यात आला.
यावेळी अ‍ॅड.नाझेर काझी, संगीतराव भोंगळ, डि.एस. लहाने, साहेबराव सरदार, मंगलाताई रायपूरे, दिनकराव देशमुख, आशाताई पवार, संतोष पाटील, सत्तार  कुरेशी, इक्राम सेठ, मेहर अली, तनवीरखान, नाझीमा हाजी इसाकखान, पाऊलझगडे यांच्यासह असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते या सायकल मोर्चात  सहभागी झाले होते.