Breaking News

स्वाईन फ्ल्यूच्या उपचारासाठी औषधसाठा उपलब्ध ठेवा

सातारा, दि. 02 (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा प्रसार आणि धोका उद्भवू नये यासाठी शासकीय रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात स्वाईन फ्ल्यूच्या प्रतिबंधात्मक उपचारासाठी पुरेसा औषधाचा साठा उपलब्ध ठेवावा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहामध्ये स्वाईन फ्ल्यू संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वाघमारे बोलत होते. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्ज्वला माने, डॉ. सी. डी. कारंजकर यांच्यासह सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
स्वाईन  फ्ल्यूची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरुन न जाता प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय किंवा फॅमिली डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यावेत. उपचार अर्धवट सोडू नयेत. स्वाईन फ्ल्यू होऊ नये म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे शक्यतो टाळावे, गर्दीची ठिकाणी रुमाल किंवा मास्कचा वापर करावा. बाहेरुन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावे. पौष्टिक आहार घ्यावा भरपूर पाणी प्यावे. सौम्य ताप खोकला, घसा दुखणे, खवखवणे, अंगदुखी, सर्दी, श्‍वास घेण्यास त्रास, उलट्या होणे अशी लक्षणे  दिसल्यास तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी.
आरोग्य विभागाने सातारा शहरातील गर्दीच्या ठिकाणी स्वाईन फ्ल्यू माहितीचे फलक लावावे. तसेच एसटी बसेसला स्टीकर्स लावावे. सार्वजनिक गणेश मंडळांना त्यासंबंधीची माहिती पत्रके वाटप करावी. गाव पातळीवर ग्रामपंचायत व शाळेंच्या माध्यमातून स्वाईन फ्ल्यू जनजागरण सभा आयोजित करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी वाघमारे यांनी दिल्या.