Breaking News

जिल्ह्यातील 338 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

सातारा, दि. 02 (प्रतिनिधी) : नोव्हेंबर ते फेब्रवारी या कालावधीत मुदत संपणार्‍या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या सातारा जिल्ह्यातील 338 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका पुढील सहा महिन्यांत होत आहेत. या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. सातारा जिल्ह्यातील 338 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयार करण्यात येणार्‍या मतदार याद्यांसाठी जुलै 2017 पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. मतदारांना दि. 4 सप्टेंबरपर्यंत सूचना व हरकती दाखल करता येतील. दि. 7 सप्टेंबरपर्यंत प्रभागनिहाय मतदार यादीची जाहीर नोटीस प्रसिध्द करुन त्यानंतर अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने काढण्यात आले आहेत.