Breaking News

मलकापूर विभागात फॉल्टी मिटर बदलून देण्याचे साडेसहा हजार प्रकरणे प्रलंबित

बुलडाणा, दि. 28, सप्टेंबर - तालुक्यातील नवीन मीटर लावून देण्याचे सुमारे साडेसहा हजारांपेक्षा जास्त प्रकरणे महावितरण वीज कंपनीच्या मलकापूर विभागीय  कार्यालयांतर्गत प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती आहे. कंपनीच्या संबंधित अधिकार्‍यांनी त्यास दुजोरा दिला आहे. अर्थात सद्यस्थितीत कंपनीच्या स्थानिक  कार्यालयात नवीन मीटरच नाहीत हे वास्तव आहे. मात्र, जुन्या मीटरमध्ये काहीच दोष नसताना हजारो वीज ग्राहकांना जुने मीटर बदलून देण्याच्या कारणावरुन  अडचणीत आणून सर्वसामान्य जनतेची कोंडी करण्याचा प्रकार वीज वितरण कार्यालयाकडून होत असल्याने सर्वसामान्यांमध्ाून संताप व्यक्त होत आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, महावितरण कंपनीच्या मलकापूर विभागीय कार्यालयाअंतर्गत मलकापूर, नांदूरा, मोताळा व जळगाव जामोद अशा चार तालुक्यांतील  कृषीपंप, औद्योगिक, घरगुती, वाणिज्य व अभय योजनेतील वीज ग्राहकांचा समावेश आहे. चारही तालुक्यातील वीज ग्राहकांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे काम  मलकापूर विभागीय कार्यालयांतर्गत आजवर होत आले आहे. अलिकडच्या काळात मात्र वीज ग्राहकांच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याची माहिती आहे.  यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, मलकापूर विभागात सुमारे दीड हजारांवर वीज ग्राहकांनी चार ते पाच महिन्यांपासून नवीन मीटरसाठी पैसे भरुनही त्यांच्या अर्जाचा  विचार अद्याप झालेला नाही. महावितरण कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवून झिजवून त्या वीज ग्राहकांचे जीव अक्षरक्ष: मेटाकुटीस आल्याच्या प्रतिक्रिया ग्राहक  व्यक्त करत आहेत. मलकापूर विभागात मीटर रिडरच्या वतीने हजारो मीटर फॉल्टी घोषित करण्यात आले. त्या धर्तीवर फॉल्टी मीटर बदलून देण्यासाठी अर्ज केलेले  सुमारे चार हजारांवर वीज ग्राहकांची प्रकरणे अजूनही प्रलंबित असल्याची माहिती आहे.परिणामी वीज वापर नसताना सरासरी बीलांच्या गोंडस नावाखाली वीज  ग्राहकांना महिन्याकाठी लाखो रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागत असल्याने वीज ग्राहकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होताना दिसत आहे. मलकापूर विभागीय  कार्यालयांतर्गत उपलब्ध मीटर विषयी चौकशी केली असता वरील कार्यालयाकडूनच पुरवठा नाही, असे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले. आता प्रश्‍न असा की, नवीन  मीटर नाही ही बाब महावितरण कंपनीपुरती मर्यादित राहते. यात वीज ग्राहकांचा काय दोष? उलटपक्षी अव्वाच्या सव्वा बिलापोटी आर्थिक भूर्दंड त्यांना सहन करावा  लागत असल्याने हजारो वीज ग्राहकांत संताप व्यक्त होताना दिसतो.
दरम्यान फॉल्टी मीटर बदलून देण्याची तथा नवीन मीटर लावून देण्याची सुमारे साडेसहा हजारांवर प्रकरणे आजमितीस प्रलंबित आहेत. त्यामुळे महावितरण  कंपनीच्या मलकापूर विभागीय कार्यालयांतर्गत येणार्‍या हजारो वीज ग्राहकांत कुठल्याही क्षणी उद्रेक होवून आंदोलनात्मक भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.  मलकापूर विभागात वीज ग्राहकांत असंतोष वाढत चालला असताना वीज कर्मचार्‍यांची चांगलीच गोची झाली आहे. त्यांच्या मते वीज ग्राहकांना न्याय देण्याची भूमिका  असली तरी प्रत्यक्षात तसं करता येत नसल्याने त्यांनाही वीज ग्राहकांच्या नाराजीस सामोरे जावे लागत आहे.