Breaking News

एलआयसीने पूर्ण केल्या दोन कोटीहून अधिक नवीन पॉलिसीज - प्रशांत नायक

पुणे, दि. 02, सप्टेंबर - गेल्या आर्थिक वर्षात (2016-17) भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) मार्केट शेअर अर्थात बाजारातील हिश्श्यात विमा  पॉलिसीच्या निकषावर लक्षणीय वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात एलआयसीने दोन कोटी एक लाखापेक्षा अधिक पॉलिसी पूर्ण केल्या असून, जवळपास सव्वा  लाख कोटी रुपये प्रथम हप्ता उत्पन्न प्राप्त केले आहे, अशी माहिती पुणे विभाग एक चे वरिष्ठ मंडळ अधिकारी प्रसांत नायक यांनी दिली. दरम्यान, 62 व्या  वर्धापनदिनानिमित एक ते सात सप्टेंबर या कालावधीत एलआयसी सप्ताहाचे आयोजन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
एलआयसीच्या 62 व्या वर्धापनदिनानिमित्त (1 सप्टेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत एलआयसीच्या कामगिरीचा आढावा घेताना प्रसांत नायक बोलत होते. यावेळी  विपणन अधिकारी अब्राहम वर्गिस आणि डी. एम. सुखात्मे यांच्यासह एलआयसीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रसांत नायक म्हणाले, पॉलिसी संख्येवर आधारित एलआयसीचा बाजारातील हिस्सा 76.09 टक्के, तर प्रथम हप्ता उत्पन्नावरील हिस्सा 71.07 टक्के आहे.  सद्यस्थितीतील पॉलिसींची संख्या 29.04 कोटी इतकी आहे. 31 मार्च 2017 अखेर एलआयसीचे एकूण उत्पन्न चार लाख 92 हजार 626.60 कोटी असून, एकूण  मालमत्ता 25 लाख 72 हजार 028 कोटी इतकी आहे. तर एलआयसीची गंगाजळी 23 लाख 23 हजार 802.59 कोटी आहे. एलआयसीने 215.58 लाख दाव्यांचे  निराकरण केले असून, दाव्यांपोटी एक लाख 12 हजार 700.41 कोटी रुपयांचे वितरण केले आहे. त्यामध्ये मुदतपूर्व दाव्यांचे प्रमाण 98.34 टक्के, तर मृत्यू दाव्यांचे  प्रमाण 99.63 टक्के आहे. एलआयसीने लोककल्याणासाठी अनेक योजनांना अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले आहे. पायाभूत सुविधांमध्ये मोठा वाटा आहे. गृहनिर्माण  (65,693 कोटी), उर्जा (1,17,398 कोटी), रस्ते व पूल आणि रेल्वे (35,210 कोटी) क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर 12 व्या पंचवार्षिक योजनेसाठी  14 लाख 23 हजार 055 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. समाजोपयोगी कामांसाठी एलआयसीने 398 प्रकल्पांसाठी 88.06 कोटींचे अर्थसाहाय्य केले आहे.  स्वच्छ भारत अभियानांतर्गत शाळांमध्ये स्वच्छतागृहे उभारण्यासाठी 1.48 कोटी, तर स्वच्छ गंगा अभियानासाठीही एलआयसीने अर्थसहाय्य दिले आहे, असे नायक  यांनी यावेळी नमूद केले.
एलआयसीच्या योजनांविषयी बोलताना नायक म्हणाले, कॅशलेस इंडियाच्या दृष्टिने युपीआय आधारित विमा हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. रिन्युअल हप्ता  भरण्यासाठी सिटी युनियन बँकेच्या शाखांमध्येही सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. एपीऑनलाईन, एमपीऑनलाईन,  इम्फोसर्व, कॉमन सर्विस सेंटर यासह विविध बँकातही विमा हप्ता भरता येणार आहे. याशिवाय निवडक विकास अधिकार्यांना, विमा प्रतिनिधींना हप्ता स्वीकारण्याचे  अधिकार देण्यात आले असून, जवळपास 2100 लाईफ प्लस केंद्रावर हप्ता भरता येईल. ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी 73 कस्टमर झोन कार्यरत आहेत.  तक्रार अगर शंका असल्यास 9222492224 या क्रमांकावर एसएमएस सुविधा देण्यात आली आहे.