Breaking News

..तर नरेंद्र मोदींचा दोष काय?

दि. 25, सप्टेंबर - तारूण्यात केलेला उतमात वृध्दत्वाच्या लाचारीला निमंञण देण्यास कारणीभुत ठरतो. तारूण्यात असलेल्या आत्मविश्‍वासाच्या, सामर्थ्याच्या  जोरावर कमाई करण्याऐवजी बापजाद्याच्या जीवावर भौतिक सुखासाठी होणारी उधळपट्टी आयुष्याच्या संध्याकाळी हातात कटोरं घेऊन दारोदार भटकायला लावते.  व्यक्तीगत पातळीवर लागू असलेला हा सिध्दांत सार्वजनिक म्हणजे राष्ट्रीय धोरणालाही लागू होतो. बालपणी रूजलेली संस्काराची बीजं तारूण्याची दिशा आणि दशा  ठरवितात. आणि हेच तारूण्य पुढे जाऊन अखेरचे दिवस कसे घालविणार हे ठरविते. राष्ट्र विकासाचे गणित यापेक्षा वेगळे नसावे. आजपर्यंत आपल्या राज्यकर्त्यांनी  केलेल्या उधळपट्टीची बीज स्वातंञ्याच्या बालसंस्कारात रूजली. त्याचा परिणाम आज भोगावा लागतो आहे. नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या सरकारला शिव्यांची लाखोली  वाहून प्रायश्‍चित घेता येणार नाही, खरेतर मोदींचा दोष काय ? या प्रश्‍नाचे उत्तर विवेकाला स्मरून कुणीच देत नाही. उलट प्रवाहाच्या विरोधात पोहण्याची फॅशन  जपण्याचा पराक्रम प्रत्येक जण करतो आहे.
वृत्तपञ समोर आले की कुठे ना कुठे ठळक स्वरूपात विद्यमान केंद्र राज्य सरकारवर टिकेचा भडीमार करणारे वृत्त प्रसिध्द झालेले दिसते. वृतवाहीन्या स्वीच ऑन  केल्या की धर्म, जात, महागाई, जीएसटी, कर्जमाफी, भडकणारे इंधन, सिमा प्रश्‍न, निर्वासीत, शरणार्थी अशा विविध मुद्यांवर सरकार अपयशी ठरत असल्याचे  वृत्तांकन भडकपणे होतांना दिसते. उरल्या सुरल्या सोशल मिडीयावर देखील याच मुद्यांना केंद्रस्थानी ठेवून थेट नरेंद्र मोदींना लक्ष्य केले जाते. भारतीय लोकशाहीत  भारताचा सर्वात मोठा गुन्हेगार कोण आहे तर ते नरेंद्र मोदी अशा भीमराणा थाटात मोदींना आरोपी ठरवून आम्ही आमचे कर्तव्य पाडतो. 2014 पर्यंत या देशात या  पैकी कुठलाच प्रश्‍न अस्तित्वात नव्हता, मोदींनी सत्ता ताब्यात घेतली आणि अचानक हे सारे प्रश्‍न अवकाशातून पृथ्वीवरील भारतात उतरले. अशा पध्दतीने  आमच्यापैकी बहुतांश मोदींसंदर्भात आकस बाळगून आहेत.
वास्तविक सध्या भारताला अनेक स्वदेशी आणि विदेशी प्रश्‍नांचा उगम कुठून आणि कसा झाला याचे उत्तर प्रत्येकाला ठाऊक आहे. हे प्रश्‍न भारतासाठी नवीन नाहीत.  स्वातंञ्यासोबत ब्रिटीशांनी हे प्रश्‍न आम्हा भारतीयांना आंदण दिले आहेत. या प्रश्‍नांना मुळासकट उखडून फेकणे शक्य असतांनाही आजवरच्या कुणाही राज्यकर्त्यांनी तो  प्रयत्न केला नाही. हे प्रश्‍न समुळ नष्ट व्हावेत हे राज्यकर्त्यांच्या हिताचे नव्हते म्हणून तात्पूरती, वरवर मलमपट्टी करून वेळ काढू धोरण स्वीकारले गेले. त्याचा परिणाम  म्हणून या प्रश्‍नांचे गँगरीन होऊन पाय कापण्याचे पातक मोदींच्या माथी मारले जात आहे.भारताला स्वातंञ्य मिळाले तेंव्हाच बाल्यावस्थेत झालेले उधळपट्टीचे संस्कार  गेली साठ सत्तर वर्ष आपण जीवापाड जपले. सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी राज्यकर्त्यांनी अनुत्पादक बाबींवर सवलतींचा मारा केला. दोन रूपये किलो तांदूळ  अन्य वस्तूंची लयलूट आणिबाणीसाठी राखून ठेवलेल्या कोट्यातून केली गेली. जनतेला देऊ केलेल्या अनेक सोयींसवलतीचा हेतू फक्त सत्ता मिळविणे आणि टिकविणे  इतकाच होता. व्यापक जन किंवा देशहिताचा दुरदृष्टीकोन बाळगणारा कुठलाच मुत्सुद्दी राजकारणी अशा प्रकारची उधळपट्टी करीत नाही, याचे दाखले जगातील अनेक  देशात उपलब्ध आहेत, नव्हे भारतातही हे दाखले मिळू शकतात. थोडक्यात आमच्या राज्यकर्त्यांनी आम्हा भारतियांची मानसिकता एखाद्या बिघडलेल्या तरूणासारखी  करून ठेवली आहे. आम्हाला आमचे अधिकार हवे असतात, माञ त्यासाठी कष्ट करण्याची तयारी माञ नसते. देश आमच्यासाठी आहे, आम्ही देशासाठी नव्हे ही  मानसिकता व्यापक देशहिताला लागलेली वाळवी आहे. या मानसिकतेतून नरेंद्र मोदी देशाला बाहेर काढण्यासाठी काही कठोर निर्णय घेत असतील तर त्यात मोदींचा  दोष काय?