Breaking News

प्रशासकीय कामकाजात गतिमानता,सुसुत्रता गरजेची - विभागीय आयुक्त झगडे

नाशिक, दि. 15, सप्टेंबर - सामान्य जनतेचा प्रशासनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी प्रशासकीय कामकाजात गतिमानता येऊन सुसूत्रतेने कामे करणेचे  गरजेचे आहे, या दृष्टीने विभागातील प्रत्येक अधिकारी कर्मचार्‍यांनी कालबद्ध कार्यवाही करावी, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित नाशिक विभागातील महसूल अधिकार्‍यांच्या कार्यशाळेस मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
झगडे म्हणाले, शासकीय कार्यालयात कामाच्या पद्धतींमध्ये अधिकारी कर्मचार्‍यांनी पारदर्शकता व गतिमानता आणल्यास जनतेच्या मनात प्रशासनाबद्दल विश्‍वास निर्माण  होईल. नागरीकांना सहकार्य होईल असे कायद्याच्या चौकटीत राहून भ्रष्टाचारमुक्त कामकाज करण्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. याबाबतच्या तक्रारींची तत्काळ दखल  घेऊन जनतेस न्याय दिला जावा. शासकीय अधिकार्‍यांनी जबाबदारीने कामे करुन आपल्या कर्मचार्‍यांकडूनही कामे करुन घेतली पाहिजेत. निवडणूक तसेच  आचारसंहिता काळात देखील प्रशासकीय कामकाज प्रभावीपणे केले जावे.
याप्रसंगी उपायुक्त स्वामी यांनी विभागातील जिल्हानिहाय कामकाजाबाबत सादरीकरण केले. यावेळी कामकाजामध्ये वस्तुस्थिती तपासून न्यायिक पद्धतीने कामे  करण्यात यावीत. अर्धन्यायिक कामकाजामध्ये कमतरता राहणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या. तालुका, जिल्हा पातळीवरील तक्रारी घेऊन  नागरीक विभागीय कार्यालयात पोहोचत असल्याने त्या पातळीवरील यंत्रणेने कामकाजातील कमतरता शोधून त्यावर कारवाई व उपाययोजना करणेची गरज आहे, असे  ते म्हणाले.
शासनाच्या प्राधान्याचे विषय, जनतेकडून प्राप्त होणारी निवेदने, लोकशाही दिनातील तक्रारींवरील कार्यवाही तसेच विभागांतर्गत विविध कामकाजात सुधारणा  होण्यासाठी त्यावरील कारवाई व उपाययोजनांबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेस सर्व नाशिक विभागातील सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय  अधिकारी, तहसिलदार उपस्थित होते.