Breaking News

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार सप्टेंबर अखेरीस ?

असमाधानकारक काम असणार्‍या मंत्र्यांना दिला जाणार नारळ 

मुंबई, दि. 13, सप्टेंबर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाली वेगवान केल्या असून, त्यासाठी फडणवीस यांनी मंत्र्यांकडून  कामाचा अहवाल मागितला आहे. राज्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याबरोबरच मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचाही मुख्यमंत्र्यांचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी 15 सप्टेंबर पर्यंत मंत्र्यांना आपला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले . पुढील महिन्यात फडणवीस  सरकारला सत्तेत येऊन 3 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे आता उर्वरित दोन वर्षात कार्यक्षम मंत्र्यांनाच स्थान देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने  घेतला आहे. त्यामुळे ज्यांची गेली तीन वर्षांतील कामगिरी समाधानकारक नाही अशा मंत्र्यांना नारळ दिला जाऊ शकतो. त्या साठी सर्व मंत्र्यांकडून त्यांच्या कामाचा  अहवाल मागविण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या या विस्तारत शिवसेनेला स्थान मिळणार की नाही या बाबत काहीच कळू शकले नाही. शिवसेनेच्या कोट्यातील 2  राज्यमंत्र्यांच्या जागा या विस्तारात भरल्या जाणार का याचा निर्णय शिवसेना नेतृत्वाकडूनच घेतला जाईल असे सांगितले जात आहे . या महिन्याच्या अखेरीस किंवा  ऑक्टोबर च्या प्रारंभी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मंत्र्यांना प्रगतीपुस्तक सादर करण्याचे आदेश !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी आपल्या मंत्र्यांचे प्रगतीपुस्तक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.  मुख्यमंत्र्यांनी आता सर्व मंत्र्यांना स्वतःच्या कामगिरीचा लेखाजोखा सादर करण्याचे आदेश दिलेत. मंत्रिपदी राहून काय काम केले, किती कल्पक योजना राबवल्या,  किती नवीन निर्णय घेतले तसेच ते निर्णय किती लोकपयोगी ठरले, याचा आकडेवारीसह आढावा देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, ही सर्व माहिती सर्व  मंत्र्यांनी विहित मुदतीत मुख्यमंत्र्यांकडे सादर करावयाची आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंतरी काही मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज आहेत, आणि जर अशा  लोकांना संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात वगळायचे असेल तर त्यासाठी आपल्या हाती काहीतरी आधार हवा, म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी हे रिपोर्ट कार्डचे अस्त्रं बाहेर  काढल्याचे बोलले जात आहे.