Breaking News

ग्रामपंचायतीतील संगणक परिचालकांचे राज्यव्यापी काम बंद आंदोलन

रत्नागिरी, दि. 26, सप्टेंबर -  ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालकांवर टास्क कन्फर्मेशन लादले गेल्यामुळे परिचालकांना सहा महिने मानधनाला मुकावे लागले  आहे. ही जाचक अट तातडीने काढून टाकावी आणि थकित मानधन तातडीने मिळावे, या मागणीसाठी राज्यभरातील परिचालकांनी आजपासून बेमुदत काम बंद  आंदोलन सुरू केले.
संगणक परिचालकांवर नव्या करारानुसार टास्क कन्फर्मेशन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महिनाभरात कोणत्या संगणक आज्ञावलीत किती काम केले, याचा  अहवाल तयार करून त्यावर ग्रामसेवकाची मान्यता घेतल्याशिवाय परिचालकांचे मानधन देण्यात येत नाही. टास्क कन्फर्मेशनमध्ये अनेक अडचणी येत आहेत. मुळात  ज्या साइटवर ही नोंद करायची आहे, ती साइटच सदोष आहे. अनेक वेळा ती साइट चालू नसते. चालू असली तरी त्यात कामकाज किती केले याच्या नोंदीच होत  नाहीत. या तांत्रिक अडचणींबरोबरच अन्य अडचणी आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीत परिचालकांना ग्रामसेवकांची अनेक कामे करावी लागतात. निरनिराळा पत्रव्यवहार  टाईप करणे, ठराव टाईप करणे, ग्रामपंचायतींमधील अनेक रजिस्टर्स लिहिणे, निरनिराळ्या पावत्या लिहिणे अशी कामे करावी लागतात. ही कामे परिचालकांच्या  कामकाजाचा भाग नसल्यामुळे टास्क कन्फर्मेशनच्या साईटवर त्याच्या नोंदी करण्याची सोय नाही. त्यामुळे ही कामे करूनही ती कामे मानधनासाठी विचारात धरली  जात नाहीत. याशिवाय अनेक ग्रामसेवक वर्षअखेरपर्यंत कॅशबुक लिहीत नाहीत. त्यामुळे त्याच्या ऑनलाइन नोंदी न दिसल्यास तो दोष परिचालकांवर टाकण्यात येतो.  टास्क कन्फर्मेशनमध्ये ग्रामसेवकांनी कॅशबुक दिले नाही, अशी नोंद करण्याची सोय आहे पण टास्क कन्फर्मेशनवर ग्रामसेवकाची सही आवश्यक असल्यामुळे अशी नोंद  केल्यास ग्रामसेवक सही न करण्याची शक्यता असते. पर्यायाने परिचालकांच्या मानधनावर परिणाम होणार आहे. सध्या सर्वत्र शेतकरी कर्जमाफीच्या नोंदी करण्याचे  काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे कामही परिचालकांना करावे लागत आहे. पण या कामाच्या नोंदी टास्क कन्फर्मेशनमध्ये नोंदवण्याची सोय नाही. त्यामुळे हे काम  करूनही परिचालकांच्या मानधनासाठी ते ग्राह्य धरले जात नाही. परिचालकांच्या पहिल्या करारावेळी ग्रामपंचायतींना देण्यात आलेले अनेक संगणक सध्या बंद आहेत.  त्यामुळे अशा परिचालकांनी काय करावयाचे, हा प्रश्‍न आहे.
या सगळ्याचा परिणाम म्हणून काम करूनही टास्क कन्फर्मेशनच्या सदोष पद्धतीमुळे संगणक परिचालक मानधनापासून वंचित राहत आहेत. गणेशोत्सवादरम्यान  परिचालकांचे मानधा झाले नाही. आता दिवाळीसारखा सण तोंडावर असताना तरी पूर्ण मानधन होणार का हा प्रश्‍न आहे. त्याकरिता परिचालकांनी आंदोलनाचा पवित्रा  घेतला आहे. आजपासून त्यांचे आंदोलन सुरू झाले.