Breaking News

सोलापुरात यंदा ध्वनिप्रदूषणाला फाटा देत डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक

सोलापूर, दि. 02, सप्टेंबर - यंदा ध्वनिप्रदूषणाला फाटा देत डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाने घेतला  आहे. मध्यवर्तीमध्ये 350 मंडळे सहभागी असून, यंदा विसर्जन मिरवणुकीत 40 मंडळे सहभागी होतील. मंगळवारी सकाळी 11 वाजता दत्त चौकात पालकमंत्री  विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते मानाच्या देशमुख गणपतीची पूजा करून विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. मिरवणुकीत मंडळाचे लेझीम, आरास, झांज,  टिपरी, दांडपट्टा आदींचा सहभाग असल्याची माहिती मध्यवर्तीचे अध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. मिरवणूक प्रारंभप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश  सरचिटणीस धर्मा भोसले, दिलीप कोल्हे, शहराध्यक्ष सुधीर खरटमल आदींची उपस्थिती राहणार आहे. मंगळवारी निघणारीविसर्जन मिरवणूक राजवाडे चौक, नवी  पेठ, चौपाड, पंजाब तालीम, मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस, चाटीगल्ली, मंगळवार पेठ पोलिस चौकी, मधला मारुती, माणिक चौक, सोन्या मारुती, दत्त चौकमार्गे  गणपती घाटावर विसर्जन केले जाते. पत्रकार परिषदेस दास शेळके, नरसिंग मेंगजी, सुनील रसाळे, बसवराज येरटे, हेमा चिंचोळकर, संजय शिंदे, विजय पुकाळे आदी  उपस्थित होते. विसर्जनमिरवणुकीत सहभागी होणार्‍या मंडळास लेझीम, आरास, झांज, टिपर्‍या, दांडपट्टा यासंबंधी बक्षीस देण्यात येणार आहे. रांगोळी, चित्रकला,  लक्ष्मी आरास स्पर्धा आदी स्पर्धेचे आयोजन करून विजेत्या मंडळास प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक आकर्षक बक्षीसे दिली जातात. शहरातील सात मध्यवर्ती मंडळांना  एकत्रित करून शहरातील चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक गणेश मंडळास मंडपाशेजारील परिसर, चौक वा बोळ कचरामुक्त  करणार्‍या मंडळानाही गौरवण्यात येणार आहे. सार्वजनिकमध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ देशातील पहिले मध्यवर्ती मंडळ आहे. धार्मिक स्थळासमोर वाजंत्री वा वाद्य  वाजवण्यास ब्रिटिश सरकारने बंदी घातली होती. कायद्याच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर त्यावेळी मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याविरोधात सन  1955 मध्ये कै. बनशेट्टी अप्पा, वि. रा पाटील यांनी याचिका दाखल केली. या कायद्यामुळे जातीय तेढ निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. युक्तिवाद  मान्य करत हा कायदा रद्द करण्यात आला. यामुळे संपूर्ण देशभर वाद्य वाजवण्यावरील बंदी उठवण्यात आली होती.