Breaking News

अवैध गर्भपात सत्र सुरूच माळशिरस आणि एक प्रकरण उघडकीस

सोलापूर, दि. 15, सप्टेंबर - अवैध गर्भपात प्रकरणामुळे सोलापूर जिल्हा चर्चेत असताना आणखी एक असंच प्रकरण समोर आलं आहे. जिल्ह्यातील अकलूज येथे  36 अवैध गर्भपात प्रकरणी डॉक्टर गांधी दाम्पत्याची चौकशी सुरु आहे. त्यातच आता माळशिरस परिसरात 9 महिलांच्या अवैध गर्भपात प्रकरणी दोन डॉक्टरांवर  गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील डॉक्टर विजयसिंह भगत आणि मेडद येथील डॉक्टर सुखदेव कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या  प्रकरणाची कुणकुण लागताच दोन्ही डॉक्टर हॉस्पिटलला कुलूप ठोकून पळून गेल्याने आता पोलिसांनी त्यांचा शोध घेणं सुरु केलं आहे. माळशिरस तालुक्यातील  मारकडवाडी, खुळेवाडी, उंबरे दहिगाव परिसरातील 9 महिलांचा अवैध गर्भपात केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सिव्हिल सर्जन डॉक्टर मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांनी  माळशिरस पोलीस ठाण्यात भादंवि 312 , 201 आणि वैद्यकीय गर्भपात अधिकार 1971 ( 5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.