ग्रामपंचायत निवडणूक : लागणार हजार मतदान यंत्रे
सोलापूर, दि. 11, सप्टेंबर - जिल्ह्यातील 192 ग्रामपंचायतींसाठी 14 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. 192 ग्रामपंचायतींसाठी 760 मतदान केंद्रे असणार आहेत. या मतदान केंद्रांवर हजार बॅलेट युनिट तर हजार कंट्रोल युनिट लागणार आहेत. प्रशासनाकडून आवश्यक असलेले 1205 बॅलेट युनिट 30 कंट्रोल युनिट मागवण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडे सध्या 795 बॅलेट युनिट उपलब्ध असून, 1205 मागवण्यात येणार आहेत. एक हजार कंट्रोल युनिट आवश्यक असून, 970 उपलब्ध आहेत, 30 मागवण्यात येणार आहेत. याशिवाय मेमरी एक हजार, मार्कर पेन 2280, पेपरसील 3040 लागणार आहेत. निवडणुकपूर्वी या सर्व गोष्टी तालुकानिहाय निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतनिवडणुकीत नवीन बदल आचारसंहितेची माहिती देण्यासाठी येत्या आठवड्यात नोंदणीकृत सर्वच राजकीय पक्षांची बैठक बोलावण्यात येणार आहे. यामध्ये जनतेतून सरपंच निवड, खर्च मर्यादा, शिक्षणाची अट, मतदान कसे करावे याबाबत माहिती दिली जाणार आहे. याशिवाय प्रथमच जनतेतून सरपंच निवड असल्याचे ग्रामपंचायतीची सदस्य संख्या अधिक एक अशी रचना राहणार आहे. सदस्यांसाठी संबंधित वॉर्डातून मतदान होणार आहे तर सरपंचपदासाठी सर्व मतदार मतदान करतील.
