Breaking News

उत्तराखंडमध्येही पूर, नद्यांनी धोक्याची पातळी गाठली

डेहराडून, दि. 03, सप्टेंबर - बिहारपाठोपाठ उत्तराखंडमध्येही अनेक ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली असून हरिद्वारमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे.  पुढील 48 तास राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून डेहराडून, हरिद्वार, नैनीताल, उधम सिंग नगर व चमोली जिल्हा येथील स्थिती अधिक बिकट  आहे. स्थानिक प्रशासन व राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांनाही दक्ष राहण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.
सोनाली नदीतील पाण्याची पातळीही धोक्याच्या पातळीच्या नजीक पोहोचली आहे. पुढील काही दिवस उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मोठा  पूर येण्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे भूस्खलन होण्याची भीती वर्तवली जात आहे. चमोली जिल्ह्यात बद्रीनाथ धाम यात्रेच्या मार्गावरही भूस्खलन होण्याची  शक्यता आहे . लामबगड येथे भूस्खलनामुळे रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.