Breaking News

खा .राजू शेट्टी , आ. बच्चू कडू राज्यव्यापी शेतकरी आघाडी ?


मुंबई, दि. 16, सप्टेंबर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी हे आमदार बच्चू कडू यांच्या साथीने भाजप , शिवसेना , काँग्रेस - राष्ट्रवादीला  पर्याय म्हणून नवी आघाडी स्थापन करण्याच्या विचारात आहेत. 
राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप - शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादी ठोस पर्याय ठरू शकत नाही असे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून दिसून आले आहे .  त्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून भाजप शिवसेनेला आपणच पर्याय का उभा करू नये असा विचार खा. शेट्टी करत असल्याचे त्यांच्या सहकार्‍यांकडून  सांगण्यात येत आहे . त्या दृष्टीने शेतकरी आंदोलनातील काही संघटनांची साथ घेता येईल का याची चाचपणी ते करत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी पेक्षा अशी शेतकरी  आघाडीच भाजप शिवसेनेला समर्थ पर्याय ठरू शकते असा विश्‍वास शेट्टी यांना वाटतो आहे , असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील सूत्रांनी सांगितले . त्या साठी  राज्यव्यापी दौरा काढून वातावरण तापवावे अशी योजना असल्याचे बोलले जात आहे. जर संपूर्ण ताकद लावून मैदानात उतरलो तर काँग्रेस राष्ट्रवादीलाही आपल्या  मागे यावे लागेल असा शेट्टी यांचा आखाडा आहे. भारतीय जनता पक्षापासून फारकत घेतल्यानंतर शेट्टी हे भाजपला पर्याय देण्याच्या दृष्टीने चाचपणी करत असल्याचे  सांगितले जात आहे. त्या दृष्टीने आमदार बच्चू कडू यांना साथीला घेण्याची त्यांची योजना असल्याचे सांगण्यात येत आहे . आमदार कडू हे आक्रमक आंदोलनासाठी  प्रसिद्ध आहेत. सदाभाऊ खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर काढल्यानंतर शेट्टी यांना आक्रमक सहकार्‍याची जरुरी भासते आहे. स्वाभिमानी शेतकरी  संघटना वाढण्यात खोत यांच्या आक्रमक भाषणांचा मोठा वाटा आहे . ती उणीव आमदार बच्चू कडू भरून काढतील असा शेट्टींचा अंदाज आहे . कडू यांना मानणारा  मोठा वर्ग विदर्भात आहे . या माध्यमातून स्वाभिमानी चा विदर्भात पाया विस्तारला आहे.