Breaking News

सप्तश्रृंगी गडावरील बोकडबळीची प्रथा बंद

नाशिक, दि. 16, सप्टेंबर - साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या वणी येथील सप्तश्रृंगी गडावर दरवर्षी दस-याच्या दिवशी दिला जाणा-या बोकडबळीची प्रथा  यंदापासून बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला. या प्रथेमुळे निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न तसेच चेंगराचेंगरी टाळण्यासाठी आणि सर्वात  महत्वाचे म्हणजे पशुहत्या रोखण्यासाठी प्रशासनाने हे पाउल उचलल्याचे तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितले. या निर्णयाबाबत भाविकांमध्ये दोन भिन्न मतप्रवाह  निर्माण झाले असून काही भाविकांनी या निर्णयास विरोध दर्शविला आहे.
नवरात्रोैत्सव काळात वणी येथे श्री सप्तश्रृंगी देवी गडावर 21 ते 30 सप्टेंबर या कालावधीत उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाचे नियोजन करण्याकरिता  कळवणचे उपविभागीय अधिकारी अर्जुन श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली बेैठक पार पडली.
या बैठकीला सर्व शासकीय विभागाचे प्रमुख, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, गड व नांदुरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. दरवर्षी दसरयाच्या दिवशी  ट्रस्टच्यावतीने बोकडबळी दिला जातो.याकरीता बोकडाची मिरवणूक काढण्यात येउन त्याचे शिर छाटले जाते व हे शिर मंदिरात नेले जाते.
यावेळी भाविकांची मोठी गर्दी होते. गेल्यावर्षी बोकडबळी देतांना मानवंदनेप्रसंगी (हवेत गोळीबार) 12 जण जखमी झाले होते. यामुळे भाविकांची सुरक्षा लक्षात घेत  यंदापासून बोकडबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. देवी मंदिरात जातांना ज्या ठिकाणी ही प्रथा पार पाडली जाते ती जागा अतिशय अरूंद  आहे.
या प्रथेदरम्यान येथे सुमारे 400 ते 500 भाविक एकत्र जमतात. त्यामूळे चेंगराचेंगरी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही तसेच कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍नही  निर्माण होत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितले. त्यामूळे काही भाविकांकडून या निर्णयाला विरोध होत असला तरी  यासाठी पुढाकार घेणा-यांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले. बोकडबळी प्रथेबाबत कोणीही अफवा पसरवत भाविकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करू नये  अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
गड ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे व यात्रेपूर्वी ते दुरुस्त करावेत. गड व नांदुरी भागात  बीएसएनएल सेवेचा सतत बोजवारा उडालेला असतो त्याबाबत संबंधित विभागाने लक्ष द्यावे.
गडावर यात्राकाळात व्यावसायिकांनी अतिक्रमणे करू नये. प्लॅस्टिक बंदी कायम ठेवून कापडी पिशव्यांना प्राधान्य द्यावे. गडावरील सांडपाणी, स्वछतागृह हागणदारी  मुक्ती यावर संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या. यात्रा काळात अखंडपणे वीजपुरवठा होईल याबाबतची माहिती वीज वितरण कंपनीचे अधिकारी खैरनार यांनी  दिली. खासगी रित्या होणार्या अन्नदान यंत्रणेवरही या बैठकीत चर्चा झाली.
रोख किंवा शिधा स्वरूपात आपली देणगी देवस्थानकडे देत अन्नदान करावे जेणेकरून अन्नाची नासाडी व पर्यावरण समतोल बिघडणार नाही याची काळजी घेण्यात  येणार आहे.
असा असेल बंदोबस्त : 1 अतिरिक्त अधीक्षक, 2 डीवायएसपी, 10 निरीक्षक, 15 उपनिरीक्षक, 200 पोलीस कर्मचारी, 50 महिला कर्मचारी, 250 होमगार्ड,  एसआरपीएफची एक टीम व घातपात विरोधी एक पथक, नागरी सुरक्षा व सेवाभावी यंत्रणेची 50 अशी यंत्रणा यात्राकाळात सज्ज राहील, अशी माहिती पोलीस  निरीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.
गडावर प्लास्टिक बंदी : सप्तश्रृंग गडावर यंदा प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरीता सर्व पूजा साहित्य विक्रेत्यांना आदेशही देण्यात आले आहेत.  ग्रामसभेनेही तसा ठराव केला आहे. मात्र पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनेही महसूल यंत्रणेने यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत संबंधितांवर दंडात्मक व व्यावसायिक  परवाने रद्द करण्याची कारवाई करण्याच्या सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आल्याचे तहसिलदार चावडे यांनी सांगितले.