Breaking News

पावसाचा पडणारा थेंब-न-थेंब जमीनीत मुरला पाहिजे - राजेंद्रसिंह

नंदुरबार, दि. 16, सप्टेंबर - प्रत्येकाने शाश्‍वत पाणीसाठे निर्माण करणारी व परिवर्तनवादी लोकचळवळ निर्माण करुन पावसाचा पडणारा थेंब-न-थेंब स्वत:च्या  मालकीचा आहे. तो माझ्या जमिनीतच मुरला जावा, यादृष्टीने आपण प्रत्येकाने एकनिष्ठ राहून प्रयत्न करण्याची आज गरज आहे असे प्रतिपादन जलतज्ञ डॉ. राजेंद्र  सिंह यांनी आज केले.
जिल्हा जलसाक्षरता समिती नंदुरबार व यशदा पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात जलसाक्षता सभेचे आयोजन  करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन,  मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता,डी.डी. जोशी, यशदाचे डॉ. सुमंत पांडे, आदि मान्यवर उपस्थित होते.
डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे हे पाणी जमिनीवर पडून वाहून जाते, ते अडविले जात नसल्यामुळे ते थेट नदी, नाले, ओढे, समुद्राला  जाऊन मिळते. त्याचा काहीच उपयोग होत नाही. शेतीसाठी पाऊस हे समीकरण मान्य केले तर नैसर्गिक प्रवाहातून येणारे पाणी देखील त्या-त्या ठिकाणी बांध  घालून तसेच अन्य मार्गाने अडवून तेथेच जमिनीत मुरविण्याचा यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी यावेळी बोलतांना सांगितले, जलसाक्षता योजनेअंतर्गत जिल्ह्यात जलदूत, जलनायक, जलप्रेमी व जलकर्मी तयार  करावयाचे असून यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक आहे. यामुळे मुलांना लहान वयातच त्यांच्यावर चांगले संस्कार होतील. त्यामुळे एका वर्षातच  जिल्हयाची प्रगती दिसेल. यावेळी जलसाक्षरता केंद्र यशदाचे डॉ. सुमंत पांडे यांनी जलसाक्षरता कृती आराखडा, प्रशिक्षण व संनियंत्रण याबाबत पॉवर पाईट द्वारे  माहिती दिली.
कार्यकारी अभियंता,डी.डी. जोशी, यांनी यावेळी उपस्थितांना जलप्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमास प्रतिभा शिंदे, चैत्राम पवार, शिवाजी भोईटे, रामसिंग वळवी यांच्यासह  विविध स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, नागरिक विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.