Breaking News

एका व्यंगचित्रात हजारो शब्दांची ताकद - शिवाजीराव पाटील

पुणे, दि. 26, सप्टेंबर - अनेकदा शब्दांतून मांडण्याचा प्रयत्न करूनही ज्या गोष्टी शब्दात व्यक्त होत नाहीत, अशा गोष्टी एका व्यंगचित्रातून सहजपणे मांडता येतात.  कारण एका व्यंगचित्रात हजारो शब्दांचा ऐवज सामावलेला असतो. असे मत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.
भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने समाजात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तींना श्री भैरवनाथ गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यंदाचा पुरस्कार  वितरण खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. व्यंगचित्राच्या माध्यमातून प्रबोधन त्याबरोबर मराठी अस्मिता, भाषा, संस्कृती जतन  करण्याबद्दल व्यंगचित्रकार गणेश भालेराव यांना श्री भैरवनाथ गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी खासदार पाटील बोलत होते.
आंबेगाव मधील मंचर लांडेवाडी येथे पार पडलेल्या भैरवनाथ गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी कल्पना शिवाजी आढळराव पाटील, शिवसेनेचे  जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, अरूण गिरे, अ‍ॅड. अविनाश रहाणे, धनंजय आल्हाट, भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, सामाजिक कार्यकर्ते  दिपक खैरनार, सुरज धंदर, विशाल चव्हाण, आतिष पाटोळे, सागर पाटील आदि उपस्थित होते.
खासदार पाटील म्हणाले की, व्यंगचित्रकला ही मुळातच आक्रमक कला आहे, कारण ती प्रतिक्रियेतून जन्माला येते. कोणत्याही कलेचा उद्देश विध्वंस करणे हा नसतो,  मात्र व्यंगचित्रे ही सुरंगाप्रमाणे स्फोटक तर कधी फुलांप्रमाणे कोमल भासतात. गणेश भालेराव यांच्या विविध विषयांवरील व्यंगचित्रांमध्ये मार्मीकता, प्रतिभा,  संवेदनशीलता असे सर्व गुण असतात. तसेच त्यात राजकीय चिमटे, मराठी अस्मिता, भाषा, संस्कृती जतन असेही विषय पाहायला मिळतात. समाजाकडे विशेष  नजरेने पाहणा-या जादूगाराचा गौरव आज होत आहे.