Breaking News

शासकीय इतमामात अजित काशीद यांना अखेरचा निरोप

सांगली, दि. 28, सप्टेंबर - शहीद जवान अजित काशीद अमर रहे, जब तक सूरज चाँद रहेगा, अजित तेरा नाम रहेगा, भारत माता की जय, देश का बेटा कैसा  हो, शहीद अजित काशीद जैसा हो, अशा गगनभेदी घोषणा देत साश्रुपूर्ण नयनांनी शहीद जवान अजित काशीद यांना बुधवारी त्यांच्या मूळ गावी निगडी खुर्द (ता.  जत) येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. 
त्यावेळी आमदार विलासराव जगताप, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, माजी आमदार उमाजी सनमडीकर, सांगली  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन सुनील गोडबोले व हवालदार संदीप काळे यांच्यासह अजित काशीद यांचे नातेवाईक व हजारोंचा जनसमुदाय उपस्थित  होता.
शहीद अजित काशीद यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव बुधवारी पहाटे पाच वाजता निगडी खुर्द येथे आणण्यात आले. सर्वप्रथम त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांच्या  अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले. त्यावेळी आई, वडील, भाऊ, बहीण व अन्य नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. अजित काशीद यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन  घेताना अनेकांचा कंठ दाटून आला. काशीद कुटुंबियांसह त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
त्यानंतर उपस्थित जनसमुदायासाठी अजित काशीद यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यावेळी उपस्थितांच्याही डोळ्याच्या पापण्या दुखाश्रूंनी पाणावल्या.  विधी पार पडल्यानंतर अजित काशीद यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली. त्यात गावकर्यांसह शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या  होत्या. अंत्ययात्रा मार्गासह निगडी खुर्द गावातील प्रत्येक चौकात शहीद अजित काशीद यांना श्रध्दांजली देणारे डिजीटल ङ्गलक लावण्यात आले होते.
ही अंत्ययात्रा गावातील प्रमुख मार्गावरून अजित काशीद यांच्या शेतात आली. त्याठिकाणी 109 इन्ङ्गंट्री बटालियन (टी. ए.) मराठा एल. आय. चे जवान व सांगली  जिल्हा पोलीस दलाच्यावतीने बंदुकीच्या हवेत तीन ङ्गैरी झाडून अजित काशीद यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी अजित काशीद यांच्या  पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. शहीद अजित काशीद यांच्या कुटुंबियांचीही या मान्यवरांनी भेट घेऊन सांत्वन केले व आधार दिला. शहीद  अजित काशीद हे 23 वर्षांचे होते व ते अविवाहित होते. त्यांच्या पश्‍चात आई चिंगुबाई काशीद, वडील नारायण काशीद, भाऊ सुनील काशीद व विवाहीत बहीण  निर्मला कदम असा परिवार आहे. बंधू सुनील काशीद यांनी शहीद अजित काशीद यांच्या अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले व भडाग्नी दिला. त्यावेळी पुन्हा एकदा  विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.