Breaking News

ग्राहकाला शाश्‍वत वीज देणे ही ’महावितरण’ ची जबाबदारी - ऊर्जामंत्री बावनकुळे

नाशिक, दि. 14, सप्टेंबर - प्रत्येक ग्राहकाला शाश्‍वत वीज मिळवून देण्याची जबाबदारी ही महावितरण कंपनीची आहे. आज प्रत्येक क्षेत्रात वीजवाहिनी ही  रक्तवाहिनीचे काम करीत असल्याने अखंडीत वीज देऊन ग्राहकाची अडचणी सोडविणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजना व नाशिक जिल्ह्यातील पायाभूत आराखडा-2 अंतर्गत 33 केव्हीच्या 17 उपकेंद्रांचा  भूमीपूजन व लोकार्पण सोहळा इच्छामणी मंगल कार्यालय, नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात उर्जामंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री  दादासाहेब भुसे आदी उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, प्रत्येक ग्राहकाला अखंड वीज मिळण्यासाठी सर्व शाखा अभियंत्यानी ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करून अशा  मेळाव्यांमध्ये ग्राहकांच्या अडचणीचे निवारण करावे. नाशिक शहरातील अपघात प्रवण ठिकाणे शोधून हा धोका हटविण्याची योजना सरकारने आखली असून त्यामुळे  हे शहर वीज अपघातातून मुक्त होणार आहे.
‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने’अंतर्गत शेतकर्‍यांना माफक दरात व त्यांच्या सोयीनुसार वीजपुरवठा उपलब्ध व्हावा म्हणून एक ते दोन मेगावॅट वीजनिर्मीत  करणारे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील. यासाठी गावातील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन जमीन उपलब्ध करून दिल्यास ही जमीन पंचवीस वर्षाच्या भाडेतत्वावर  घेऊन लागणारी वीज सौर ऊर्जा प्रकल्पामार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच या वाहिनीची देखभाल दुरुस्ती महावितरण कंपनी करेल, अशी माहिती बावनकुळे  यांनी दिली.  प्रत्येक गावात वीजपुरवठा नियमित मिळण्यासाठी तसेच वीज संदर्भात येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील 776 ग्रामपंचायतीमध्ये  आयटीआय इलेक्ट्रॉनिक उत्तीर्ण तरुणास ‘ग्राम विद्युत व्यवस्थापक’ म्हणून नियुक्त करण्यासाठी त्वरीत कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश यावेळी संबंधीत शाखा  अभियंत्यांना देऊन ग्राहकांनी देखील महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहनही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वडझीरे, इगतपूरी, करंजाळी, उंबरठाण, कोर्‍हाटे, जान्होरी, जळगाव निगोज, कुपखेडा, माळदे, साकोरा या नाशिक जिल्ह्यातील दहा  उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा तसेच दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्येाती योजना व एकात्मिक उर्जा विकास योजनेंतर्गत त्र्यंबकेश्‍वर, मालेगाव, सिन्नर, येवला या  तालुक्यातील सात नवीन उपकेंद्रांचे भूमीपूजन करण्यात आले.  आमदार बाळासाहेब सानप, सौ. सीमा हिरे, जयंतराव जाधव, यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना  वीज विषयक कामाच्या अपेक्षा व्यक्त केल्या व ग्राहक मेळाव्यातून केलेल्या कामाचे कौतूक केले. या कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या जनता दरबारात ऊर्जामंत्री  चंद्रशखेर बावनकुळे यांनी जनतेच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश संबंधीत अधिकार्‍यांना देऊन जनतेकडुन  मांडण्यात आलेल्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला.