Breaking News

मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बापास अटक

सांगली, दि. 14, सप्टेंबर - स्वतःच्या तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कय्युम उस्मान नदाफ (वय 35, रा. गुरूवार पेठ, मिरज) याला  त्याच्या पत्नीच्याच फिर्यादीवरून सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. कय्युम नदाफ याला येथील सांगली जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी  बुधवारी तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली. दरम्यान, कय्युम नदाफ याला ताब्यात द्यावे, या मागणीसाठी येथील न्यायालय परिसरात गर्दी केलेल्या शिवसेनेसह  अन्य महिला संघटनांच्या 12 कार्यकर्त्यांना सांगली शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत संशयिताची पत्नी शाहीन नदाफ हिने सांगली शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि. 8 सप्टेंबर रोजी साडे दहा वाजण्याच्या सुमारास  पती कय्युम नदाफ हा आपल्यासह मुलीला चारचाकी (क्रमांक एमएच 10- सीए 7500) वाहनातून नेण्यास आला होता. त्याच्या सांगण्यावरून आपण मुलीसह  त्याच्यासमवेत निघालो. कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौकात अचानकपणे गाडी थांबवून कय्युम नदाफ याने पाठीमागील सीटवर बसलेल्या तीन वर्षाच्या मुलीवर  लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पवन चौधरी करीत आहेत.
दरम्यान, कय्युम नदाफ याला येथील न्यायालयात हजर केले असता त्याठिकाणी शिवसेनेसह व अन्य महिला संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्याला आपल्या ताब्यात  द्यावे, यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. त्यातील काही महिला हातात चप्पल घेऊनही कय्युम नदाफ याच्या अंगावर धावून गेल्या. याचवेळी कय्युम नदाफ याचेही  पाठीराखे तिथे जमल्याने न्यायालय परिसरात काहीकाळ मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र सांगली शहर पोलिसांनी परिस्थिती कौशल्याने हाताळत आंदोलक  महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व त्यांची रवानगी विश्रामबाग पोलिस ठाण्याकडे करण्यात आली.