Breaking News

राज्य विधीमंडळ अंदाज समिती सदस्यपदी सुधीर गाडगीळ

सांगली, दि. 21, सप्टेंबर - राज्य विधीमंडळाच्या सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या अंदाज समितीचे सदस्य म्हणून आमदार सुधीर गाडगीळ यांची नियुक्ती करण्यात आली  आहे. गत तीन वर्षात तदर्थ समितीवर अध्यक्ष व आश्‍वासन समिती सदस्य म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामाची पोचपावती म्हणूनच सुधीर गाडगीळ यांची राज्य  विधीमंडळाच्या महत्त्वाच्या या समितीवर निवड करण्यात आलेली आहे. सुधीर गाडगीळ यांच्या या निवडीचे राज्यभर कौतुक होत आहे.
ही अंदाज समिती प्रतिवर्षी विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या किंवा नव्याने स्थापन करण्यात आलेल्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभानंतर अनेक  महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचविण्याचे काम करते. त्यात अर्थसंकल्पीय अंदाज व पूरक अनुदानासाठीच्या मागण्यांची छाननी करण्याचेही काम करते. अंदाज व मागण्या  ज्या धोरणावर सुसंगत असे काटकसरीचे उपाय सुचविण्याचीही मोठी जबाबदारी या अंदाज समितीवर असते. राज्याचे अंदाजपत्रक ज्या नमुन्यात विधीमंडळास सादर  करावयाचे असते, तो नमुना ही अंदाज समितीच सुचवित असते.
या अंदाज समितीला आवश्यक वाटेल अशा रितीने खर्चाच्या अंदाजांची तपशीलवार छाननी करणे व राज्य शासनाची उद्दिष्टे अत्यंत काटकसरीने पार पाडण्यासाठी  मार्गदर्शन करते. पूरक व अनुदानासाठीच्या मागण्यांची छाननी करणे व या समितीकडे विचारार्थ पाठविण्यात येतील अशा वित्तीय प्रश्‍नांवर राज्य शासनाला सल्ला  देण्याचेही काम या अंदाज समितीचे असते. अंदाज समितीने अर्थसंकल्पीय अंदाज किंवा पूरक अनुदानासाठीच्या मागण्या यांची केलेली छाननी करण्याचा व  विधानसभेने त्यात असलेली अनुदाने अगोदरच मंजूर केली असतील, तर त्या बाबत सल्ला देण्याचाही या अंदाज समितीस हक्क आहे.
या अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अनिल कदम असून सुधीर गाडगीळ यांच्यासह ऍड. राज पुरोहित, उन्मेश पाटील, कृष्णा खोपडे, श्रीमती देवयानी ङ्गरांदे, विजय  रहांगडाले, राजेश काशिबार, सुनील प्रभू, प्रकाश आंबेडकर, संजय रहिमूलकर, बाळासाहेब पाटील, प्रदीप जाधव, क्षितीज ठाकूर, श्रीमती नीलम गोर्हे व आबू आझमी  आदी सदस्य आहेत.