Breaking News

फिफा अंडर 17 वर्ल्ड कपकरीता पार्किंग व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन आणि बसेस व्यवस्था

नवी मुंबई, दि. 21, सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात नवी मुंबईत संपन्न होणा-या ‘अंडर 17 वर्ल्ड कप इंडिया 2017’ च्या नियोजनासाठी महाराष्ट्र शासनाच्या  शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षण व सहनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून  स्पर्धा सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आलं आहे.
दि. 06, 09, 12, 18 व 25 ऑक्टोबर या दिवशी नेरुळ, नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये एकूण 8 सामने होणार असून यावेळी देशापरदेशातून  मोठ्या संख्येने येणा-या क्रीडा रसिकांसाठी वाहतुक व्यवस्थेच्या नियोजनावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई वाहतुक  पोलीस विभाग यांनी संयुक्तरित्या पाहणी करून वाहनतळाच्या जागा निश्‍चित केल्या असून सदर जागांच्या ठिकाणी पार्किंगसाठी नियोजन करण्यात आले आहे.
यामध्ये ग्रॅँड सेंट्रल मॉल सिवूड, सेक्टर 40, नेरुळ तसेच सायन पनवेल महामार्गावर एम.आय.डी.सी. बाजूकडील रहेजा युनिव्हर्सलची जागा नेरुळ, सिवूड स्टेशन  जवळील गणपतशेठ तांडेल मैदान, करावे गावाजवळील श्रीगणेश तलावाजवळील जागा, उरण फाट्याजवळ प्लॉट नं. 8 ए, 8 बी, 13 बी ची मोकळी जागा,  त्याचप्रमाणे लिटील वंडर मॉल, खारघर अशा 6 ठिकाणी साधारणत: 13 हजार वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करण्यात आलेले आहे. पार्किंगच्या निश्‍चित  केलेल्या जागांवरुन सामने बघण्यासाठी स्टेडियमपर्यंत जाण्याकरीता एन.एम.एम.टी मार्फत वातानुकूलित व साध्या बसेसची अल्प दरात व्यवस्था करण्यात आली  असून स्टेडियमच्या जवळील रेल्वे स्टेशन, बसडेपो येथूनही बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
नवी मुबंईत होणा-या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी येणा-या खेळाडू आणि क्रीडा रसिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याबाबत संपूर्ण काळजी नवी मुंबई  महानगरपालिका व सर्वच प्राधिकरणांमार्फत घेण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिली आहे.