Breaking News

भारनियमनानुसार औरंगाबाद महापालिकेने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक करावे - महावितरण

औरंगाबाद, दि. 15, सप्टेंबर - नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी महावितरणच्या विजेच्या लोडशेडिंगनुसार महानगरपालिकेने आपल्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक  निश्‍चित करावे असे पत्र महावितरणने औरंगबाद महानगरपालिकेला दिले आहे. शहरात लोडशेडिंगमुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. आधीच चार ते पाच  दिवसानंतर शहरवासीयांना पाणी मिळत आहे. यामुळे लोडशेडिंगची वेळ बदलावी, अशी मागणी एमआयएमच्या नगरसेवकांनी केली होती. याशिवाय खासदार चंद्रकांत  खैरे यांनी महावितरण कार्यालयाच्या अधिकार्‍यांसोबत घेतलेल्या बैठकीतही पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आठवड्यातून एकदा नळाला पाण्याचे पाणी येत आहे.  वीज नसल्यामुळे अनेक भागात पाणीपुरवठा होणार नाही. यामुळे नागरिकांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. याबाबत महावितरण कार्यालयाने लोडशेडिंगचे  फेरनियोजन करावे, अशीही सूचनाही खासदारांनी केली होती. याबाबत मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी महावितरण आणि महापालिकेची बैठक घेऊन  पाणीपुरवठ्याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले होते, मात्र मंगळवारी ही बैठक घेण्यात आली नाही. बुधवारी महावितरणने महापालिकेला पत्र पाठविले  आहे. सध्या विजेचा तुटवडा असल्यामुळे महावितरणला शहरात लोडशेडिंग करावी लागत आहे. लोडशेडिंग केल्यामुळे पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे.  नागरिकांना पाण्याचा योग्य पुरवठा करण्यासाठी महापालिकेने त्यांच्या पाण्याच्या वेळेत बदल करावा, असे पत्र महाविरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी महापालिकेला  दिल्याची माहिती महावितरणाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिला.