Breaking News

जुनी पेंशन योजना सुरु करण्यासाठी मेहकर तहसिलदारांना दिले निवेदन

बुलडाणा, दि. 28, सप्टेंबर - अन्यायकारक डीसीपीएस, एनपीएस योजना बंद करुन जुनी पेंशन योजना सुरु करण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य  जुनी पेंशन हक्क संघटन या स्थानिक शाखेकडून मुख्य सचिवाच्या नावे मेहकर तहसिलदारांना देण्यात आले. 
निवेदनात नमूद आहे की, 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचार्‍यांना डी.सी.पी.एस. योजना लागू करण्यात आली असून सदर योजना आता  एन.पी.एस.मध्ये वर्ग करुन अंमलबजावणी करण्यात येत आहे. या दोन्ही योजनेमुळे कर्मचार्‍यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून सदर योजनेमुळे भविष्यात  कर्मचार्‍यांना कसा लाभ होईल, याबाबत कुठलीही ठोस तरतूद दिसत नाही.
आज रोजी एखादा कर्मचारी मयत झाल्यास त्याच्या कुटुंबाकरीता काय तजविज आहे याबाबत स्पष्ट सूचना नाही. 2005 पूर्वी सेवेत आलेल्या कर्मचार्‍यांना लागू  असलेल्या भविष्य निर्वाह निधीतून कर्मचारी गरजेच्या वेळी पैसा काढू शकतो. 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचार्‍यांसाठी ही योजना नसून त्यांना कुठल्यानी कुठल्या  कारणासाठी कर्ज काढल्याशिवाय पर्याय नाही. परिणामी हा वर्ग कर्जबाजारी होत चालला आहे. या सर्व बाबींचा विचार करता 2005 नंतर सेवेत आलेल्या  कर्मचार्‍यांना जुनीच पेंशन योजना लागू करण्याची विनंती निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना जी.बी.शिंदे, व्ही.पी.जाधव, अमोल खरात, समिधा मिश्रा,  रश्मी मुळे, गितांजली महाजन, संतोष राणे यांच्यासह नगरपालिका, तहसिल, पाटबंधारे आदी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.