Breaking News

हुतात्म्यांचे स्मरण ठेवणे काळाची गरज -रामराजे नाईक-निंबाळकर

सातारा, दि. 11, सप्टेंबर - स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्राणाची आहुती देणार्‍या महान स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण ठेवणे ही आजच्या काळाची गरज  आहे,असे विचार विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मांडले.
वडूज येथे हुतात्मा दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात विधान परिषद सभापती नाईक-निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष  संजीव नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, वडूज नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष शोभा माळी, पंचायत समितीचे सभापती संदीप  मांडवे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे,जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, प्रदीप विधाते, सुरेंद्र गुदगे, माजी  आयुक्त प्रभाकर देशमुख, वसंतराव घार्गे, ज्ञानेश्‍वर जाधव, संदीप पोळ आदी यावेळी उपस्थित होते.
1942 च्या भारत छोडो आंदोलनात वडूज येथे 9 सप्टेंबर 1942 रोजी एकाच वेळी स्वातंत्र्यासाठी नऊ हुतात्म्यांनी प्राणाची आहुती दिली. त्यांचे स्मरण भावी  पिढीलाहोण्याची गरज असल्याचे सांगूननाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, महात्मा गांधीनी अहिंसक चळवळीतून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. महात्मा गांधीजीच्या  हाकेला प्रतिसाददेऊन वडूजमध्येही 1942 साली परशुराम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला होता. त्याला पोलीसांनी अडवूनही मोर्चेवाल्यांनी माघार घेतली  नाही. यावेळी झालेल्यागोळीबारात परशुराम घार्गे यांच्यासह त्यांचे अन्य सहकारी शहीद झाले. त्यांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे,  असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
1942 च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये खटाव तालुक्याने इतिहास रचना आहे, असे सांगून आमदार शिशिकांत शिंदे पुढे म्हणाले, 9 सप्टेंबर 1942 रोजी परशुराम घार्गे  यांच्या नेतृत्वाखाली वडगाव पंचक्रोशीतील अनेक देशभक्तांनी वडूजच्या मामलेदार कचेरीवर तिरंगा फडकविणसाठी आगेकूच केली. वडगाव ते वडूज हे अंतर पायी  चालत गेले. या मोर्च्यावर झालेल्या गोळीबारात वडगाव व परिसरातील 9 जणांना हौतात्म्य प्राप्त झाले. यांचा आदर्श ठेवून त्यांना अपेक्षित असलेला देश  घडविण्यासाठी प्रयत्न करा हेच खरे त्यांना अभिवादन असेल, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, हुतात्म्यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे. 9 सप्टेंबर 1942 रोजी परशुराम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली  निघालेल्यामोर्च्यावर झालेल्या गोळीबारात वडगाव व परिसरातील 9 जणांना हौतात्म्य प्राप्त झाले. त्यांचा इतिहास युवा पिढीपर्यंत सक्षमपणे पोहचविण्याची आपली  सर्वांची जबाबदारी आहे. त्यांचा इतिहास युवा पिढीला प्रेरणा देण्याचे काम करेल, असा विश्‍वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
तत्पूर्वी विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हुतात्मा स्मारक येथे भेट देऊन हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र व हुतात्मा कै. परशुराम घार्गे यांच्या  अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांचे वारस यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. तसेच वॉटर कप स्पर्धेतील विजेत्या गावे  तसेच एनकूळ गावचाही यावेळी सत्कार करण्याता आला. या कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांचे वारस, विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.