Breaking News

कोणत्याही स्त्रीचा अनादर केलेला नाही; एकनाथ खडसे यांचे स्पष्टीकरण

मुंबई, दि. 07, सप्टेंबर - आजवर आपण कुठल्याही स्त्रीचा अनादर केलेला नसून अंजली दमानियांविषयी कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही, असे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी व प्रदेश प्रवक्ते गणेश हाके उपस्थित होते. खडसे म्हणाले की, अंजली दमानिया यांनी आपल्याविरोधात आरोपांची प्रक्रिया सुरू केली आहे. आपल्यावर आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा त्या प्रयत्न करतात. त्यांची जमीन सरकारजमा झाली यामुळे सूडबुद्धीने त्या आरोप करतात. त्यांनी आपल्याविरोधात केलेला कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर आपली त्यांच्याशी कधी भेटही झालेली नाही किंवा परवाच्या भाषणात आपण कोणाचे नावही घेतले नाही. अशा स्थितीत प्रसिद्धीसाठी दमानिया यांनी विनयभंगाचा आरोप केला आहे.
त्यांनी सांगितले की, आपल्याविरोधात दाऊदशी संभाषणाचा आरोप करण्यात आला पण सरकारने चौकशी केली असता त्यामध्ये तथ्य नसल्याचे आढळले. दुसऱा आरोप पीएने लाच घेतल्याचा करण्यात आला. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक खाते व लोकायुक्तांनी चौकशी केली आणि आरोपात तथ्य नसल्याचे सिद्ध झाले. जावयाने लिमोझिन गाडी घेतल्याचा आरोप करण्यात आला पण चौकशीअंती त्यामध्येही तथ्य नसल्याचे सिद्ध झाले. भोसरी येथील जमीन आपल्या जावयाने नियमानुसार खरेदी केली आहे. कोणत्याही आरोपाबाबत चौकशीला आपण तयार आहोत.