पुण्यातील सामूहिक ढोलवादनाचा रविवारचा कार्यक्रम रद्द?
पुणे, दि. 02, सप्टेंबर - पुणे महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त तीन हजार सहाशे ढोल वादकांच्या सहभागाने आयोजित केलेल्या ढोल वादनाच्या कार्यक्रमाला मुहूर्त लाभेना. ’गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ संस्थेने या कार्यक्रमाला परवानगी दिली खरी परंतु गणेशविसर्जनाला आता चारच दिवस शिल्लक राहिल्याने आणि जवळपास सर्वच ढोलपथकांनी मंडळांकडून वादनाच्या सुपार्या घेतल्याने या कार्यक्रमात ते सहभागी होऊ शकणार नाहीत. पुण्यातील शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त पुणे महापालिका आणि ढोल ताशा महासंघ यांच्या वतीने विश्वविक्रमी ढोल करण्याचा उपक्रम सुरूवातीला एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्याचे ठरवले होते. मात्र, पोलीस आयुक्तांनी शांतता झोनचे कारण देऊन येथील वादनास परवानगी नाकारली होती. त्यानंतर बालेवाडी येथे वादन करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार, रविवारी बालेवाडी येथे शहरातील सर्व ढोल पथकातील तीन हजार 600 वादक एकत्र वादन करून या वादनाचा विश्वविक्रम करणार होते. यासाठी गिनीज वल्ड ऑफ रेकॉर्डकडे पाठपुरावाही सुरू होता. मात्र रविवारच्या वादनास गिनीज बुककडून वेळ न मिळाल्याने हे वादन रद्द करावे लागले. त्या नंतर आता गिनीज बुक कडून नव्याने परवानगी घेऊन गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी तीन सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करीत होते. मात्र ते शक्य नसल्याचे ढोल पथकाच्या प्रमुखांनी सांगितले आहे. दोन, तीन आणि चार सप्टेंबर या कालावधीतील मंडळांसमोर आणि विसर्जन मिरवणुकीत वादन करण्याच्या सुपार्या ढोल पथकांनी घेतल्या आहेत. त्यामुळे या कालावधीत महापालिकेने उपक्रम आयोजित केला तर ते त्यामध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. या ढोल पथकातील प्रत्येक ढोल वादकाला महापालिकेकडून प्रत्येकी दीडशे रुपये मानधन देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र मंडळांशी केलेल्या करारामुळे हे शक्य नसल्याचे ढोल-ताशा महासंघाचे प्रमुख पराग ठाकूर यांनी सांगितले. दहाव्या दिवशी उपनगरांतील मंडळांचे गणपती विसर्जन असल्याने अनेक पथकांचे वादन उपनगरांमध्ये असते. तसेच यावर्षी 12 व्या दिवशी विसर्जन असल्याने तीन तारखेलाही अनेक मंडळांसमोर ढोल वादनाचे कार्यक्रम होणार आहेत, असे ठाकूर म्हणाले.