Breaking News

भीमा नदीपात्रात 70 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

सोलापूर, दि. 15, सप्टेंबर - उजनीच्या धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणातून 70 हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.  दरम्यान मागील काही दिवसांपासून उजनी धरणावरती पावसाने तळ ठोकलेला असून उजनी धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा  नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जात आहे.
रात्रीपासून उजनी धरणामध्ये दौंड येथून येणार्‍या विसर्गातही वाढ झालेली असून तो 42 हजार 345 क्युसेक एवढा आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीपात्रात  सोडल्या जाणार्‍या विसर्गात वाढ होण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत. दौंड येथून उजनी धरणात येणारा विसर्ग व धरण क्षेत्रात पडलेला पाऊस यांची  तुलना करता उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडला जाणारा विसर्ग 1 लाख क्युसेकवर जाण्याची शक्यता आहे.वीर धरणातून निरा नदीत 14 हजार 111  क्युसेक एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. निरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्याकडून  मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यात रात्री दमदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे नीरा नदीच्या पाण्यात आणखी वाढ होणार आहे. हे सर्व पाणी भीमा नदीत येत  असल्यामुळे भीमा नदीचा पूरप्रश्‍न गंभीर होणार आहे.