Breaking News

बस दरीच्या कठड्याला अडकली अन् ते 70 जण थोडक्यात बचावले..!

औरंगाबाद, दि. 02, सप्टेंबर - देवगिरी कॉलेजचे 70 विद्यार्थी नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक भंडारदरा धरण पाहण्यासाठी गेले असता प्राणांतिक संकटातून  बालंबाल बचावले. या प्रवासात दरीत रस्ता वळला पण बसचे स्टिअरिंग वळलेच नाही त्यामुळे बसवरचे चालकाचे नियंत्रण सुटून बस दरीच्या दिशेने वेगाने जावू  लागली. मात्र धरणाच्या पायथ्याशी असलेल्या उतारावर एका कठड्याला बस अडकल्याने बस दरीत न जाता थांबली. आतील 70 विद्यार्थी थोडक्यात बचावले. हा  बांका प्रसंग पाहून भंडारदरा धरणावर आलेल्या पर्यटकांनी या बसमधील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धाव घेवून मदत केली. औरंगाबाद येथील देवगिरी कॉलेजचे 70  विधार्थी व शिक्षक स्वामी समर्थ ट्रॅव्हल्सच्या (बस क्रमांक एम एच 04-7216) बसने आज (शुक्रवार) भंडारदरा पाहण्यासाठी आले होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या  सुमारास शेंडी गावाकडून भंडारदरा धरणाच्या पायथ्याजवळील गार्डनकडे जाण्यासाठी निघालेली बस एका वळणावर स्टेरिंग सरळ राहिल्याने ती सरळ कठड्यावर  जाऊन आदळली. चालकाने प्रसंगावधान राखून बसवर ताबा मिळवून विद्यार्थ्यांना बस मधून खाली उतरण्यास सांगितले. बसच्या मागील टायरखाली दगड टाकून बस  स्थिर केली. यावेळी आजूबाजूचे पर्यटकही बसकडे धावले. त्यांनी बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास मदत केली.