भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली
सोलापूर, दि. 02, सप्टेंबर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदीवर बांधलेले सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेलेली आहेत. यामुळे नदीकाठावरील कर्नाटक मंगळवेढा तालुक्यातील गावाशी असलेला संपर्क तुटला आहे. यामुळे दोन्ही बाजूच्या नागरिकांना टाकळी बेगमपूरमार्गे जावे लागत आहे. तालुक्यात भीमा नदीवर असलेली कोल्हापूर पद्धतीचे वडापूर, तेलगाव (भीमा), अरळी (मंगळवेढा), भंडारकवठे (गोविंदपूर), सादेपूर (उमराणी), औज (मंद्रूप), चिंचपूर ही बंधारे पाण्याखाली गेलेली आहेत. नदीचे पात्र सध्या दुथडी भरून वाहत आहे. सर्व बंधार्याच्या वर किमान पाच सहा फुटांहून अधिक पाण्याचा प्रवाह आहे. वरील सर्वच बंधार्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. वडापूर, सिद्धापूर या जिल्ह्यातील दोन गावांचा असलेला संपर्क कालपासून तुटला आहे. तेलगाव अरळी या गावाचाही संपर्क या पाण्याने बंद झाला आहे. भंडारकवठे, उमरज, गोविंदपूर, निवरगी, रेवतगाव या पाच गावाचा संबंध आज सकाळपासून बंद झाला आहे. सादेपूरहून उमराणी, हत्ताळी, चडचण, लोणी, हविनाळ या सहा गावांशी असलेली वाहतूक काल दुपारपासून बंद पडली आहे. हीच परिस्थिती अन्य बंधार्याची झालेली आहे. महिला शेतमजूर अन्य शेतीची कामे करण्यासाठी मजूर लोक इकडून तिकडे तिकडून इकडे येत असत. पण उजनीचे पाणी सोडल्याने वाहतूकच बंद झाली आहे. एकंदर बंधार्यावरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प आहे. बंधार्यावरून पाणी वाहू लागल्याने अनेक दुचाकी स्वार इतर वाहनचालकांना परत जावे लागले. कर्नाटक हद्दीतील लोकांना टाकळी मार्गे जावे लागले.