Breaking News

ऊस गाळप परवाना मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत

पुणे, दि. 25, सप्टेंबर - ऊस गाळप परवाना देण्याची प्रक्रिया साखर आयुक्त कार्यालयाने सुरू केली आहे. त्यानुसार 2017-18 या गाळप हंगामासाठी साखर  कारखान्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन गाळप परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याची येत्या 30 सप्टेंबर मुदत देण्यात आली आहे.
राज्यात मागील वर्षीच्या हंगामात राज्यात 150 साखर कारखाने सुरू झाले होते. मागील हंगामात 373 लाख टन ऊस गाळप होऊन सुमारे 42 लाख टन साखरेचे  उत्पादन झाले होते. यावर्षी राज्यात ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली असल्याने मागील ऊस उपलब्धतेमुळे सुरू न झालेले साखर कारखाने यावर्षी सुरू  होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा साखर कारखान्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साखर आयुक्त कार्यालयाने गाळप परवाना  मिळविण्याकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या सूचना कारखान्यांना दिल्या आहेत. त्यासाठीचे परिपत्रक कार्यालयाने जारी केले आहे. त्यानुसार साखर  कारखान्यांनी साखर आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर लॉगईन करणे आवश्यक आहे.
साखर कारखान्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. गाळप परवाना फी व सुरक्षा अनामत रकम 30 सप्टेंबरपर्यंत भरणे आवश्यक आहे. जे  कारखाने भाडेतत्त्वावर गाळप हंगाम घेणार आहेत. अशा साखर कारखान्यांनी झालेला करार त्यास मिळालेली साखर आयुक्त कार्यालय मान्यतेची प्रत व करारातील  अटी व शर्तीनुसार केलेली पूर्तता याची माहिती देण्याची सूचना केली आहे.
2017-18 च्या गळीत हंगामासाठी 160 दिवसांकरिता गाळप परवाना देण्यात येईल. सदर परवाना कारखान्याचा गाळप हंगाम अथवा ऊस संपेपर्यंत लागू राहिल.  कारखान्यांनी साखर आयुक्तांच्या पूर्व परवानगी शिवाय कारखाने बंद करू नये, अशा सूचना साखर आयुक्तांनी दिल्या आहेत. या गाळपासाठी नोंद केलेला सर्व ऊस  गाळप करण्याची जबाबदारी संबधित साखर कारखान्यांवर राहणार आहे.
ऑनलाईन गाळप परवाना अर्ज विहित मुदतीत सादर न करणे, गाळप परवाना प्राप्त करून न घेताच गाळप सुरू करणे. तसेच गाळप परवान्यातील अटींचे पालन न  करणे, याबाबत महाराष्ट्र साखर कारखाने आदेश 1984 नुसार साखर कारखान्यांबर कारवाई करण्यात येईल.