Breaking News

देशाला सर्व जाती-धर्मातील महापुरुषांची गरज - डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे, दि. 25, सप्टेंबर - महाराष्ट्र आणि देश बहुसांस्कृति, बहुधार्मिक, बहुजातीय, बहुभाषिक आहे. हे वेगळेपण समजून घ्यायचे असेल तर आपण सार्वभौमत्व टिकवू  शकू. देशाचे संविधान टिकावायचे असेल आणि चीन -पाकिस्तानला तोंड द्यायचे असेल तर जातीपाती, धर्म, महापुरूष, संतांची बेरीज केली पाहिजे. देशाला आणि  राज्याला सर्व महापुरूषांची गरज आहे, असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनीव्यक्त केले. 
कवी कै. कुसुमाकर शिंपी (जगताप) लिखित ‘माझी कविता’ या कविता संग्रहाचे उदघाटन साहित्यिक डॉ. लीला गोविलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. सबनीस  बोलत होते. माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे, कवी डॉ. शंतनू चिंधडे, महात्मा फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागचे प्राध्यापक डॉ. मनोहर  जाधव, डॉ. भालचंद्र जगताप, धनंजय जगताप आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. सबनीस म्हणाले, कवी कुसुमाकर यांनी महात्मा फुले, साने गुरूजी, विनोबा भावे, लोकमान्य टिळक, भाऊराव पाटील अशा संतनिष्ठा आणि महापुरूषांवर कविता  केल्या आहेत. त्यांनी पन्नास वर्षांपूर्वी या कवितेतून या सर्व संताची आणि महापुरूषांची बेरीज त्यांनी केली आहे. सध्या प्रत्येक महापुरूष आणि संताना वेगवेगळ्या  जाती धर्मात विभागण्यात आले आहे. मात्र, आपला देश आणि महाराष्ट्र बहुभाषिक, बहुप्रांतिक, बहुजातीय, बहुधर्मिय आहे. आपले हे वैशिष्ट्य टिकवून ठेवून  सार्वभौमत्व जपण्यासाठी आपल्याला सर्व महापुरूषांची आणि संतांची बेरीज करणे आवश्यक आहे.
यावेळी डॉ. गोविलकर, अशोक धिवरे, डॉ. चिंधडे, डॉ. मनोहर जाधव यांचेही भाषण झाले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय जगताप यांनी आभार  मानले.