Breaking News

टाटा मोटर्सतर्फे कामगारांना 29 हजारांचा बोनस

पुणे, दि. 27, सप्टेंबर - टाटा मोटर्स आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये मंगळवारी 2016-17 या आर्थिक वर्षाकरता बोनस व 2017 -18 या  आर्थिक वर्षाकरता सानुग्रह अनुदान रकमेसाठी करार झाला. ज्यामध्ये कंपनीने एकूण 29 हजार इतकी रक्कम करारानुसार देण्याचे मान्य केले आहे.
यावेळी या करारावर व्यवस्थापनातर्फे अलोक सिंग, प्लांट हेड ( पुणे वर्क्स ), सरफाज मणेर, हेड एचआर सीव्हीबीयू पुणे व इतर व्यवस्थापन अधिकारी यांनी तर  युनियनच्या वतीने अध्यक्ष समीर धुमाळ, कार्याध्यक्ष सतिश काकडे, सरचिटणीस उत्तम चौधरी, खजिनदार गणेश फलके, संयुक्त सचिव अबीद अली सय्यद,  कार्यकारिणी सदस्य महेंद्र कदम, सुनील रसाळ, राम भगत, प्रतिनिधी विलास सपकाळ, विक्रम बालवडकर यांनी सह्या केल्या.
युनियनने उत्पादनाचे उद्दीष्ट गुणवत्तेसह गाठत उत्पादन खर्चात कपात केली आहे. त्यामुळे कंपनीने हा बोनस जाहीर केला आहे. कंपनीच्या सुपरअ‍ॅन्युएशन स्कीममध्ये  समाविष्ट असलेल्या कामगारांना 8 हजार 550 रुपये ही अ‍ॅड हॉक रक्कम देण्याचे कंपनीने जाहीर केले आहे. यावेळी कंपनीचे कार्यकारी संचालक व सीओओ सतिश  बोरवणकर यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना कंपनीची उत्पादकता व खर्चात कपात याबाबत युनियन व त्यांच्या सभासदांकडून अधिकाधिक योगदानाची अपेक्षा  व्यक्त केली.
गेल्या काही वर्षांमध्ये विविध उपक्रम राबवून कंपनीची प्रगती उंचवण्यास कामगार युनियन व व्यवस्थापन महत्वपूर्ण योगदान कंपनीला मिळाले आहे. या करारामुळे  कंपनीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीची आर्थिक स्थिती चांगली नसतानादेखील कंपनी व्यवस्थापनाने ही रक्कम दिल्याबद्दल सर्व कामगारांनी  कंपनीचे आभार मानून कंपनीबाबत कृतज्ञता व्यक्त केली.