पवना धरणातून 2867 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग
पुणे, दि. 21, सप्टेंबर - गेल्या 24 तासात पवना धरण परिसरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातून 2867 क्यूसेक या वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पवना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंदा पाऊस चांगला पडल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण जुलै अखेर 100 टक्के भरले आहे. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. गेल्या 24 तासात धरण परिसरात जोरदार पाऊस सुरु असून 63 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, एक जूनपासून 3374 मिमी पाऊस धरण परिसरात झाला आहे.हायड्रो पॉवर आऊटलेटद्वारे (बुधवारी) पहाटे पाच वाजल्यापासून 1400 क्यूसेक या वेगाने नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली होती. परंतु, पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने आता 2867 क्यूसेक वेगाने नदीपत्रात पाणी सोडण्यात येत आहे. पावसाची परिस्थती पाहून पाणी कमी-जास्त केले जाणार आहे, अशी माहिती अभियंता मनोहर खाडे यांनी दिली. पाऊस सुरूच राहिला तर पवना नदीतील पाण्याची पातळी वाढू शकते. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, दरवर्षी पवना धरण 15 ऑगस्ट पर्यंत भरते. परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिकेने यंदा 2 मे पासून पाणीकपात केली होती. त्यामुळे 1 जून रोजी धरणात 20.28 टक्के इतका पाणीसाठी शिल्लक होता. यंदा पाऊस चांगला झाल्याने जुलैअखेर धरण 100 टक्के भरले आहे.