Breaking News

रस्त्याच्या 123 दयनीय अवस्थेमुळे जिवंतपणीच अनुभवली अंत्ययात्रा!

अहमदनगर, दि. 15, सप्टेंबर - मानवी जीवनाची कहाणी काही औरच म्हणावी लागेल. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एखाद्याला जीवंतपणीच स्वतःची अंत्ययात्रा पाहण्याचे  दुर्भाग्य मिळेल, हे केवळ नियतीच्याच हाती आहे. येथील हृदयविकाराने त्रस्त असलेल्या साळूबाई भगवान वनवे यांना हा दारुण प्रसंग उघड्या डोळ्यांनी पहावा  लागला. त्याचे असे झाले, आजारी वणवे यांना उपचारार्थ दवाखान्यात नेण्यासाठी डांबरी रस्त्यावरून रुग्णवाहिका त्यांच्या घरापर्यंत येत नाही. त्यामुळे  वनवे यांना  अक्षरशः जीवंतपणीच  अंत्ययात्रा काढून त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. आपली अंत्ययात्रा जिवंतपणी काढल्याचा अनुभव त्यांना याची देही याची डोळा आला.   त्यांना अक्षरशः चार खांदेकरी यासाठी नेमण्यात आले. तालुक्यातील सामनगाव या गावातील ही घटना असून सामनगाव ते जुना आव्हाने खुर्द या रस्त्यावर असणारी  वांढेकर वस्तीच्या रस्त्याचा प्रश्‍न एवढा गंभीर झाला आहे, की या वस्तीला जायला धड रस्ता नाही. या वस्तीवर सामनगाव या गावातून अंतर्गत सामनगाव जुना  आव्हाणे बुद्रुक या रस्त्याची अवस्था खूपच दयनीय झाली आहे.
गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि सर्वच तालूका पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेला मात्र याचे काहीच देणंघेणं नसल्याचे दिसत नाही. स्थानिक रहिवाशांनी  या रस्त्याची दयनीय अवस्था सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समितीच्या निदर्शनास आणून दिली. मात्र गेंड्याच्या कातडीच्या संबधित विभागाच्या अधिकारी  आणि एकूण प्रशासकीय यंत्रणा मात्र या विषयात हात झटकत आहे. त्यामुळे या यंत्रणेविषयी स्थनिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.