Breaking News

कर्जमाफीवरून राज्य सरकारचा वेळकाढूपणा- गावडे

अहमदनगर, दि. 15, सप्टेंबर - राज्य सरकारने शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अनेक कटकटी असून कमी  कालावधीत हे शक्य होईल, असे दिसत नाही. अनेक शेतकरी यापासून वंचित राहणार आहेत. राज्य सरकार मात्र या विषयावरून केवळ वेळकाढूपणा करीत आहे,  असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव नामदेव गावडे यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. 
शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांबाबत किसान सभेने महाराष्ट्रभर अखिल भारतीय किसान संघर्ष यात्रा काढली आहे. कोल्हापूरहू आलेली ही संघर्षयात्रा  दि. 14 रोजी  नगर जिल्ह्यात झाली. पारनेर वाडेगव्हाण येथे या यात्रेचे स्वागत करण्यात आले.  या पार्श्‍वभूमीवर गावडे बोलत होते. यावेळी सुभाष लांडे, विधिज्ञ बन्सी सातपुते,  बाळासाहेब पाटील, भैरवनाथ वाकळे, विकास गेरंगे आदी उपस्थित होते. ते म्हणाले, कर्जमाफी प्रकरणात सरकारच्या सर्व अटींना आमचा विरोध आहे. सरकारने  स्वामिनाथन आयोग लागू करावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. या संघर्षयात्रेच्या माध्यमातून सरकारच्या फसव्या आश्‍वासनांविषयी आम्ही जनजागृती करीत आहोत.
कोपरगावात होणार संघर्ष यात्रेचा समारोप
या संघर्षयात्रेच्या माध्यमातून चार मागण्यांसाठी घेराव घालो डेरा डालो आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये सरसकट संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोग  करावा, शेतकर्‍यांना पेन्शन व आयात कर वाढवावा या मागण्यांचा समावेश आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गासाठी ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या त्या कोपरगावातील  चांडेकसारे येथे या संघर्षयात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.