Breaking News

शहराच्या विकासासाठी शासनस्तरावर 100 कोटींसाठी प्रयत्न करणार : आमदार भोळे

जळगाव, दि. 30, सप्टेंबर -  शहराचा आमदार म्हणून माझे नेहमी शहर विकासाला प्राधान्य आहे. वेळप्रसंगी मी शहर विकासासाठी विरोधकांना देखील पाठींबा  दिला आहे. शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मी आजवर नेहमीच प्रयत्न केले असून निधी देखील मिळवून आणला आहे. मनपात नुकतेच पार पडलेल्या  महासभेत आमदारांनी 100 कोटींचा निधी आणावा असा ठराव पारित करण्यात आला. मी या ठरावाचे स्वागत करतो. मनपातील पदाधिकार्‍यांनी ठराव दिल्यास  पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन, माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे  आ.सुरेश भोळे (राजूमामा) यांनी कळविले आहे.
जळगाव शहराचा विकास व्हावा आणि नागरिकांना सर्व मुलभूत सुविधा मिळाव्या हाच माझा गेल्या तीन वर्षापासून अजेंडा आहे. शहरातील रस्ते, गटारी, उड्डाणपूल,  महामार्ग चौपदरीकरण, सुशोभीकरण यासह इतर कामांना मी नेहमी प्राधान्य दिले आहे. आमदार निधीच्या माध्यमातून अनेक कामे आजवर मार्गी लावली आहेत.  जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन, माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार म्हणून मागणी केल्यामुळे  त्यांनी 25 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यापुढे देखील शहराच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्याप्रमाणावर निधी आणण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे  आ.सुरेश भोळे यांनी सांगितले आहे.
जळगाव शहरासाठी कोणताही निधी आणल्यानंतर त्यातून विकासकामे करण्यात येतील. परंतु मनपातील काही पदाधिकार्‍यांना मनपामध्ये शहराच्या मूलभूत सुविधा  किंवा विकासकामांबाबत मी बैठक घेतलेली सहन होत नाही. शहराच्या विकासाबाबत देखील विरोधी भूमिका मनपाचे काही पदाधिकारी घेतात. त्यामुळे विकासकामे  कोणत्याही निधीतून केली अथवा कुणीही केले तर त्यामध्ये अडथळा आणू नये असे ही आ.सुरेश भोळे यांनी स्पष्ट केले आहे.