Breaking News

गोव्यात उद्या पोटनिवडणूक, पर्रिकरांसोबत राणेंचीही प्रतिष्ठा पणाला

पणजी (गोवा) दि. 22, ऑगस्ट - पणजी व वाळपई पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार सोमवारी संपुष्टात आला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि आरोग्यमंत्री विश्‍वजित  राणे यांच्या बरोबरच सरकारचे भवितव्य पणाला लागलेले आहे.
दोन्ही मतदारसंघात मिळून 51 हजार मतदार 7 उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. आज दुपारी अधिकारीवर्गाने मतदानकेंद्रावर जाऊन यंत्रणा उभी केली. उद्या  (बुधवार, 23 ऑगस्ट) रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार असून 28 ऑगस्टला सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.  पणजी मतदारसंघात एकूण चार उमेदवार असले तरी प्रत्यक्ष निवडणूक दुरंगी अर्थात भाजपचे उमेदवार मनोहर पर्रीकर आणि काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर  यांच्यात होणार आहे. वाळपईतही एकूण 3 उमेदवार असले तरी भाजपचे उमेदवार आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे व काँग्रेसचे उमेदवार रॉय नाईक यांच्यात सामना रंगणार  आहे.
पणजी मतदारसंघासाठी एकूण 30 मतदानकेंद्रांची स्थापना करण्यात आली असून वाळपईकरिता 46 मतदानकेंद्रे आहेत. पणजीत एकूण 22 हजार 196 मतदार असून  त्यात पुरुष 10 हजार 640 तर 11 हजार 556 महिला मतदारांचा समावेश आहे. वाळपईत एकूण 28868 मतदार असून त्यात पुरुष 14 हजार 340 तर महिला  14 हजार 528 यांचा अंतर्भाव आहे. दोन्ही मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुषापेक्षा जास्त असून पणजीत हे प्रमाण 900 च्या आसपास आहे. वाळपईत  150 महिला मतदार अधिक आहेत.