Breaking News

दगडूशेठ गणपती ब्रह्मणस्पती मंदिरात थाटात विराजमान

पुणे, दि. 26, ऑगस्ट - मोरया... मोरया... च्या जयघोषात पुष्परथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत ब्रह्मणस्पती मंदिरात दगडूशेठ  गणपती विराजमान झाला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित  उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला. ब्रह्मणस्पती मंदिरात प.पू. पीरयोगी श्री गणेशनाथ महाराज, गोरक्षनाथ मठ, त्र्यंबकेश्‍वर यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी  10.09 वाजता विधीवत श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली. 
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, सुनिल रासने, माणिक चव्हाण यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. मुख्य मंदिरापासून  सकाळी 8.45 वाजता श्रीं च्या आगमन मिरवणुकीला प्रारंभ झाला. नव्याने साकारलेल्या सुमारे 40 किलो सोन्याचे दागिने परिधान केलेली श्रीं ची विलोभनीय मूर्ती  डोळ्यात साठविण्यासोबतच दर्शनासाठी भक्तांनी चौका-चौकात गर्दी केली. मंदिरापासून निघालेल्या मिरवणुकीचा समारोप तांबडी जोगेश्‍वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक,  नगरकर तालीम चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडई मार्गे उत्सव मंडपात झाला. मिरवणुकीमध्ये नगारा, मानिनी हे महिलांचे ढोल-ताशा पथक, दरबार बँड,  प्रभात बँड सहभागी झाले होते. मुख्य पूजा मिलींद राहुरकर गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली झाली.
अशोक गोडसे म्हणाले, ग्वेदामध्ये आणि मुद्गल पुराणात गणेशाचा ब्रह्मणस्पती म्हणून प्रथम उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे देवांचे अधिपती असलेल्या गणरायाला  विराजमान होण्याकरीता नागर, द्राविड आणि वेसर शैलीतील मंदिरांप्रमाणे गाणपत्य शैलीचे आगळेवेगळे मंदिर यंदा साकारण्यात आले आहे. ब्रह्मणस्पती मंदिराचा  आकार 111 बाय 90 फूट असून 90 फूट उंची आहे. गोलाकार घुमटाखाली साकारलेला तब्बल 36 फुटी नयनरम्य गाभारा हे यंदाचे वैशिष्टय आहे.