Breaking News

सांगली जिल्हा नियोजन समितीच्या 13 जागांसाठी निवडणूक

सांगली, दि. 26, ऑगस्ट - सांगली जिल्हा नियोजन समितीच्या 23 पैकी 13 जागांसाठी अखेर निवडणूक लागली आहे. त्यात सर्वसाधारण पुरूष गटातील सहा  जागांसाठी सात, तर सर्वसाधारण महिला गटातील सात जागांसाठी 11 उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत. या 13 जागांसाठी दि. 4 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा परिषदेच्या 23, तर नगरपंचायत व नगरपालिकेच्या चार अशा 27 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. यातील 14  जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 13 जागांसाठी निवडणूक लागली आहे. या जागांसाठी दि. 4 सप्टेंबर रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडील सांगली  जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या दालनात सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेकडील खुल्या प्रवर्गातील पुरूष व महिला  गटातील जागांसाठी निवडणूक लागल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.
सर्वसाधारण पुरूष गटातील सहा जागांसाठी भारतीय जनता पक्षाचे सांगली जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी, सुरेंद्र वाळवेकर, शिवसेनेचे युवा नेते  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शरद लाड, सतीश पवार, काँग्रेसचे विक्रम सावंत व जितेंद्र पाटील या सातजणांचे, तर सर्वसाधारण  महिला गटातील सात जागांसाठी भाजपच्या श्रीमती स्नेहलता जाधव, रेश्मा साळुंखे, आशा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुरेखा आडमुठे, रयत विकास  आघाडीच्या सुरेखा जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशाराणी पाटील, राजश्री एटम, काँग्रेसच्या मनिषा पाटील व जयश्री पाटील अशा 11 जणींचे उमेदवारी अर्ज राहिले  आहेत.
नगरपालिका- नगरपंचायत गटातून वैशाली सदावर्ते, प्रतिभा पाटील, झुंझारराव पाटील व दिनकर जाधव, तर जिल्हा परिषद गटातून मनोज मुंडगनूर, सुलभा  आदाटे, राजश्री एटम, प्रमोद शेंडगे, अरूण बालटे, निजाम मुलाणी, धनाजी बिरमुळे, शोभा कांबळे, सरिता कोरबू व अश्‍विनी नाईक यांची बिनविरोध निवड झाली  आहे.